जातनिहाय जनगणना न करू शकणे ही माझी चूक आहे. आता ही चूक दुरुस्त करण्याची आपली इच्छा आहे. काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना केली जाईल, असे लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते राजधानी दिल्लीत आयोजित 'भागीदारी न्याय महासम्मेलनात' बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, "माझा उद्देश देशातील उत्पादक शक्तीला सन्मान मिळवून देणे आहे. ओबीसी, दलित, आदिवासी हे देशाची उत्पादक शक्ती आहे. मात्र, त्यांना आपल्या श्रमाचे फळ मिळत नाहीये. एवढेच नाही तर, आरएसएस आणि भाजपने जाणून बुजून ओबीसींचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला.
ओबीसींच्या समस्या लपलेल्या असतात -राहुल गांधी म्हणाले, "जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला एका गोष्टीची कमतरता जाणवते. ती चूक म्हणजे मी ओबीसी वर्गाचे संरक्षण जसे करायला हवे होते, तसे करू शकलो नाही. जेव्हा आपण आदिवासी भागांत जाता, तेव्हा आपल्याला जंगल, पाणी, जमीन, सर्वकाही दिसते. मात्र ओबीसींच्या समस्या लपलेल्या असतात."
जर मी तेव्हा जातीय जनगणना केली असती, तर... -गांधी पुढे म्हणाले, "मला वाईट वाटते की, जर मला आपल्या इतिहासाबद्दल थोडी अधिक माहिती असती, तर मी तेव्हाच त्याचे समाधान केले असते. मी व्यासपीठावरून हे सांगत आहे की, ही माझी चूक आहे. ही काँग्रेस पक्षाची नाही तर माझी चूक आहे. मी ती दुरुस्त करणार आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की, जर मी तेव्हा जातीय जनगणना केली असती, तर आता ती ज्या पद्धतीने करायची आहे, तशी झाली नसती."