मुंबई - झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच तिखट भाषेत आव्हान दिल्यानंतर सोमवारी वादाला पुन्हा एकदा नवी फोडणी मिळाली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील मीरा रोड परिसरात नुकतीच एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर भाजप व मनसेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना खा. दुबे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. ‘हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. उत्तरेत या तुम्हाला उचलून आपटतील. आपल्या घरात तर कुत्रादेखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा,’ असे दुबे यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. हिंदी भाषिक असलेल्या दुबे यांनी चक्क मराठीत हे ट्विट करीत आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
आशिष शेलारांनी टोचले कानदेशाच्या विकासदरात मराठी माणसाचे योगदान काय आहे हे माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला त्याची माहिती पाठवू, अशा शब्दात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे नाव न घेता कान टोचले. विधानसभेत भूमिका मांडताना शेलार म्हणाले की, महाराष्ट्र, मराठीच्या पराक्रमाची साक्ष जगभर आहे. त्यांनी मराठी माणसाच्या कर्तृत्वावर, कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. कुणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगू शकत नाही. मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसावर अन्याय होऊ नये या सरकारच्या भूमिका आहेत. दुबेंच्या वक्तव्यावरून भाजपचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे. भाजप त्यांच्या खासदारांवर काही कारवाई करणार का, असा सवाल उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबई व महाराष्ट्राचे योगदान काय?निशिकांत दुबे यांनी या ट्विटनंतर एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी अवघ्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राचे योगदान काय, असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्र कुणाच्या पैशांची भाकरी खातो? तिकडे टाटा, बिर्ला व रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही.
बिहार, झारखंड नसते तर टाटा व बिर्ला यांनी काय केले असते? टाटा, बिर्ला व रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात; पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता? अशा शब्दात गरळ ओकली आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष्य करत आहेत. तुम्हाला मारायचे असेल तर मग मुंबईतील तामिळी, तेलुगू आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा. आम्ही मराठीचा सन्मान करतो; पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही, असेही दुबे म्हणाले.
आग का लावताय...आमचा भाषेला विरोध नसून तिच्या सक्तीला आहे. बाहेरचे लोक इथे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी माणसाची तुलना पहलगाम हल्ल्याशी करत आहेत. त्यामुळे मराठी आणि महाराष्ट्राचे खरे मारेकरी हेच आहेत. त्यांना मराठी माणसाने ओळखले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुबेंचे विधान प्रांतिक वाद निर्माण करणारेखा. दुबेंच्या वक्तव्यावरून भाजपला मराठी-हिंदी वाद निर्माण करून वाढवायचा आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्याला भारत पाकिस्तान वादासारखा शत्रुत्वाचा रंग देण्याचा हा प्रयत्न देशभरातील भाजप नेत्यांकडून सुरू आहे. भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करण्याचा हाच अजेंडा भाजप दुबेंच्या तोंडून पुढे रेटत आहे.हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
आझाद मैदानावरही उमटले पडसाद‘शालेय शिक्षण अभ्यास कृती समिती’चे निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी आझाद मैदानात केलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनातही दुबेंच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्रात ये, तुला आम्ही आपटून मारू अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी ‘तू काय आपटून मारशील? तुला आम्ही आपटून मारू, अशा शब्दात संताप व्यक्त करीत दुबे महाराष्ट्रात आले तर चपलेचा प्रसाद नक्की देईल, असा इशाराही दिला आहे’.