आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यातील कोळशाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील ३०० फूट खोल कोळशाच्या खाणीमध्ये पाणी शिरल्याने ९ कामगार अडकले आहेत. मेघालयच्या सीमेजवळ उमरंगसो शहरामध्ये कोळशाची ही बेकायदेशीर खाण आहे. कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मात्रा या खाणीची अंतर्गत संरचना गुंतागुंतीची असल्याने बचावकार्यामध्ये अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाणीमध्ये सुमारे १०० फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. बचाव कार्यासाठी भारतीय लष्कर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या विशेष पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. सर्व पथकांकडून संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. मात्र पाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या विनंतीनुसार कामगारांना वाचवण्यासाठी लष्कराच्या विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. या पथकामध्ये पाणबुडे, इंजिनियर आणि लष्कराच्या इतर प्रशिक्षित जवानांचा समावेश आहे. भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव कार्य एका अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.