रहस्यमय चित्रपट पाहताना प्रेक्षकाचा थिएटरमध्येच मृत्यू
By Admin | Updated: June 17, 2016 21:48 IST2016-06-17T21:45:51+5:302016-06-17T21:48:36+5:30
हॉलिवूडमधील गाजलेला रहस्यपट ‘द कॉन्ज्युरिंग’चा सिक्वेल अर्थात ‘कॉन्ज्युरिंग 2’ पाहताना एका प्रेक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते आहे.

रहस्यमय चित्रपट पाहताना प्रेक्षकाचा थिएटरमध्येच मृत्यू
ऑनलाइन लोकमत
आंध्र प्रदेश, दि. 17 - हॉलिवूडमधील गाजलेला रहस्यपट ‘द कॉन्ज्युरिंग’चा सिक्वेल अर्थात ‘कॉन्ज्युरिंग 2’ पाहताना एका प्रेक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते आहे. तमिळनाडूमधील तिरुवन्नमलाईमध्ये 65 वर्षीय व्यक्तीचा थिएटरमध्येच मृत्यू झाला.
तिरुवन्नमलाईतील श्री बालसुब्रमणियर थिएटरमध्ये आंध्र प्रदेशातील दोन व्यक्ती गुरुवारी ‘कॉन्ज्युरिंग 2’ चित्रपटाचा लेट नाईट शो पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना एकाच्या छातीत दुखू लागले आणि क्षणार्धात तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
मात्र डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगितलं. मात्र मृत व्यक्तीसोबतची व्यक्ती मृतदेह घेऊन गायब झाली. या मृत व्यक्तीचा पोलीस शोध घेत असून, परिसरातील रिक्षाचालक आणि लॉजमालकांकडे चौकशी सुरू आहे.