प्रभाग क्र. ५४

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:21+5:302015-03-06T23:07:21+5:30

मूलभूत सुविधांचीही वानवा

Ward no. 54 | प्रभाग क्र. ५४

प्रभाग क्र. ५४

लभूत सुविधांचीही वानवा
इंदिरानगर : महापालिकेत गेल्या निवडणुकीत नव्याने झालेला प्रभाग म्हणजे प्रभाग ५४ होय. हा प्रभाग मनपाचा सर्वांत लहान प्रभाग म्हणून ओळखला जातो. सुमारे २८०० मतदारांचा हा प्रभाग आहे.
प्रभाग ५४ मध्ये श्रद्धाविहार, श्रद्धा गार्डन, कलानगर, रंगरेज मळा, शिव कॉलनी, पांडवनगरी, सावित्रीबाई वसाहत, पिंगूळबागसह परिसर आहे. या प्रभागात सर्वांत जास्त झोपड्या विखरलेला मतदार आहे. यामुळे प्रभागात विकास झालाच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
श्रद्धाविहार कॉलनी, पांडवनगरी, परिसरात गेल्या दहा वर्षांपासून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, तर काही भागांत अद्याप रस्त्यांचे साधे खडीकरणही झालेले नाही. तसेच कलानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अवेळी येणार्‍या पाण्यामुळे महिलावर्गाची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी धूळखात पडून आहे.
परिसरात बालगोपाळांसाठी उद्यान आणि क्रीडांगण नाही, तर श्रद्धाविहार कॉलनी व शिव कॉलनीसह काही भागांत असलेल्या मनपाच्या भूखंडांना संरक्षक भिंती बांधण्याचा सपाटाच लावला आहे, परंतु भूखंड विकसित न केल्याने हे भूखंड म्हणजे केरकचर्‍याचे माहेरघर बनले आहे.
घंटागाडी नियमित येत नसल्याने श्रद्धा गार्डनमधील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक विहीर केरकचर्‍याने भरली आहे. हा केरकचरा कुजल्याने घाण व दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पांडवनगरी बसथांब्यापासून ते शिवकॉलनी, रंगरेज मळ्यासह परिसरातून गेलेल्या पावसाळी नाल्यात भूमिगत गटारीचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच स्वच्छता कर्मचारीअंतर्गत रस्त्यांवर फिरकत नसल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
दुर्गंधीचे साम्राज्य
घंटागाडी आणि स्वच्छता कर्मचारी अनियमित येतात. यामुळे परिसरातील मोकळ्या भूखंडावर केरकचरा टाकण्यात येत असल्याने घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मनपाच्या मोकळ्या भूखंडावर संरक्षक भिंती बांधून विकसित करण्यात आले नाही. तसेच टवाळखोरांचा उपद्रव नागरिकांना होतो.
- उज्ज्वला दळे, शिवकॉलनी
पाण्याची वेळ चुकीची
महिलांचा रात्री ८ वाजेची स्वयंपाक करण्याची वेळ आणि त्याचवेळी पाणी येत असल्याने महिलांची गैरसोय होते. परिसरात उद्याने व क्रीडांगण विकसित करण्याची आवश्यकता आहे. औषध व धूरफवारणी होतच नाही.
- जिभाऊ खैरनार, रंगरेज मळा

रस्ते गेले खड्ड्यात
परिसर विकासापासून अद्यापही वंचित आहे. परिसरातील रस्त्यास दहा वर्षे होऊन गेले आहेत. त्यामुळे रस्ते खड्ड्यात हरविले आहे. त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. बंगले आणि सोसायटीचे रॅप तपासणी गरजेचे आहे. घंटागाडी अनियमित येत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
- राजेश कंकरेज, श्रद्धा गार्डन
पथदीपांअभावी अंधार
परिसरातील अंतर्गत रस्ते खडीकरण आणि डांबरी करण्याच्या प्रतीक्षेत आहे. तसेच काही भागांत पथदीपअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
- संतोष पजई, पांडवनगरी
चोर्‍यांमध्ये वाढ
परिसरात भुरट्या चोर्‍या आणि सोनसाखळी चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बालगोपाळांसाठी उद्याने आणि क्रीडांगणे नाहीत. कमी दाबाने अपरात्री येणार्‍या पाण्यामुळे महिलांची तारांबळ उडत आहे. साफसफाई होत नाही.
- गायत्री खोडे
नाल्यात गटारींचे पाणी
पावसाळी नाल्यात भूमिगत गटारींचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच औषध आणि धूर फवारणी होत नाही.
- सुधीर पानूरकर

Web Title: Ward no. 54

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.