शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम मिळाले फुकट
By Admin | Updated: October 29, 2014 18:32 IST2014-10-29T18:32:23+5:302014-10-29T18:32:23+5:30
मुंबई क्रिकेट असोसिएशनने नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम मिळाले फुकट
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - महाराष्ट्रातील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असतानाच मुंबई क्रिकेट असोसिएशनने या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे. शपथविधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम असल्याने आम्ही त्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही असे स्पष्टीकरण एमसीएचे सचिव नितीन दलाल यांनी दिले आहे.
महाराष्ट्रात भाजपाने प्रथमच सर्वाधिक जागांवर विजय मिळवत मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. ३१ ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियममध्ये शाही थाटात नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सत्तास्थापनेसाठी बाहेरुन पाठिंबा जाहीर करुन भाजपाच्या मदतीला धावून येणा-या शरद पवारांनी शपथविधी सोहळ्यासाठीही भाजपावर कृपादृष्टी दाखवली आहे. शरद पवारांचे वर्चस्व असलेल्या एमसीएने या सोहळ्यासाठी राज्य सरकारला वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. ही विनंती एमसीएने मान्य केली आहे. या सोहळ्यात सुमारे ३० हजार लोकं हजेरी लावतील अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी सजावट करण्याची धूरा ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर अशोक हांडे यांच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अंजली भागवत या दिग्गज खेळांडूसह साहित्य व कला क्षेत्रातील मंडळींनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यापूर्वी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनात पडायचा. तर १९९५ मध्ये मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या युती सरकारचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पडला होता.