निवडणूक घोषणेची प्रतीक्षा वाढली

By Admin | Updated: August 28, 2014 03:10 IST2014-08-28T03:10:58+5:302014-08-28T03:10:58+5:30

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यास आणखी एक-दोन आठवड्यांचा काही अवधी लागण्याची शक्यता आहे.

Waiting for election announcement increased | निवडणूक घोषणेची प्रतीक्षा वाढली

निवडणूक घोषणेची प्रतीक्षा वाढली

जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यास आणखी एक-दोन आठवड्यांचा काही अवधी लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीची अधिसूचना २५-२६ आॅगस्टला जारी केली जाईल, अशी चर्चा होती. परंतु आॅगस्टमध्ये अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता कमी असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. अधिसूचना जारी होण्यासाठी आणखी एक-दोन आठवडे वा त्यापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू शकते, असे निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी म्हटले आहे.
लोकमतशी बोलताना ब्रह्मा म्हणाले, ‘या वर्षअखेर महाराष्ट्रासोबतच हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्यात येतील की वेगवेगळ्या तारखेला, हे अद्याप तरी ठरलेले नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.’याआधीची निवडणूक १३ आॅक्टोबर २००९ रोजी घेण्यात आली होती. त्यामुळे यावेळीही निवडणुका आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्येच घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. ९० सदस्यांच्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ २७ आॅक्टोबरला संपेल. तेथे महाराष्ट्रासोबतच १३ आॅक्टोबर २००९ रोजी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यावेळी हरियाणात आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. ८२ सदस्य संख्या असलेल्या झारखंडमध्ये विधानसभेची याआधीची निवडणूक ३ ते २४ नोव्हेंबर २००९ या काळात घेण्यात आली होती. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ १८ जानेवारी २०१५ रोजी संपेल. जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा असून याआधी २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २००८ला सात टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. याचा कार्यकाळ १० जानेवारी २०१५ ला संपत असल्याने डिसेंबरअखेरीस निवडणुका घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Waiting for election announcement increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.