दोन चपातीचे पैसे मागितल्याने वेटरची हत्या
By Admin | Updated: November 30, 2014 16:38 IST2014-11-30T16:38:46+5:302014-11-30T16:38:46+5:30
जेवणात दोन चपाती जास्त घेतल्याने त्याचे पैसे मागणा-या वेटरची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडली आहे.

दोन चपातीचे पैसे मागितल्याने वेटरची हत्या
>ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ३० - जेवणात दोन चपाती जास्त घेतल्याने त्याचे पैसे मागणा-या वेटरची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडली आहे. हत्येनंतर मारेक-यांनी हवेत गोळीबार करुन हॉटेलमधून धूम ठोकली असून पोलिस मारेक-यांचा शोध घेत आहेत.
मेरठमधील लिब्रा या हॉटेलमध्ये काही तरुण रात्री उशीरा जेवणासाठी आले होते. या तरुणांनी दोन चपाती अतिरिक्त मागवल्या होत्या. जेवणानंतर वेटरने त्या तरुणांकडे दोन चपात्यांचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. यावरुन त्या तरुणांनी वेटरशी हुज्जत घातली. काही वेळाने यातील एका तरुणाने बंदुकीतून त्या वेटरवर गोळी झाडली. या प्रकाराने हॉटेलमध्ये गोंधळ माजला. या तरुणांनी हवेत गोळीबार करत घटनास्थळावरुन पोबारा केला. ते तरुण मद्यधूंद अवस्थेत होते असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने त्या मारेक-यांचा व्हिडीओ मोबाईल कॅमे-यात कैद केला असून या आधारे मारेक-यांचा शोध घेतला जात आहे. रतन सिंह असे या हल्ल्यात मृत झालेल्या वेटरचे नाव असून तो मुळचा उत्तराखंडमधील रहिवासी आहेत.