निर्भयपणे करा मतदान!
By Admin | Updated: October 15, 2014 05:01 IST2014-10-15T04:55:36+5:302014-10-15T05:01:32+5:30
युती आणि आघाडीचा ‘काडीमोड’ झाल्यावर त्यावर तोंडसुख घेणारे नेटकरी आता मतदानासाठी सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत आहेत

निर्भयपणे करा मतदान!
मुंबई : युती आणि आघाडीचा ‘काडीमोड’ झाल्यावर त्यावर तोंडसुख घेणारे नेटकरी आता मतदानासाठी सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत आहेत. टिष्ट्वटर, फेसबुक असो वा व्हॉट्सअॅप अशा विविध माध्यमांतून फोटोज्, व्हिडीओ व मेसेजेसच्या ‘कुछ दाग अच्छे होते है’ असे म्हणत मतदारांना निर्भीडपणे मतदानास सज्ज होण्याचा संदेश देण्यात येतो आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘सोशल मीडिया’चा फॅक्टर प्रभावी ठरला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद सुरुवातीपासूनच उमटताना दिसले. त्यात निवडणुकीपूर्वीच झालेल्या राजकीय वादळामुळे सोशल मीडियावरून टीकाटिप्पणी, विडंबन आणि हास्यापद मेसेजेस आणि फोटोज्लाही पूर आला होता.
यंदाच्या ‘पंचरंगी’ लढतीतही निर्णायक ठरणाऱ्या सोशल मीडियावर अखेरच्या टप्प्यात मतदानाचे आवाहन करणारे संदेश शेअर होत आहेत. त्यात ‘ये मेसेज केवल एडल्ट पढ सकते है...’ असे म्हणत ‘मतदान जरूर किजिए’चा संदेश देण्यात येतोय. तसेच, ‘मुमकिन है... चेंज इज पॉसिबल’ म्हणत सेलिब्रेटींचे फोटोजही सोशल नेटवर्किंग साइट्सवर फिरत आहेत. तसेच ‘सेल्फीज’ काढून वेगवेगळ्या साइट्सवर अपलोड करण्यासाठी अवश्य मतदान करा, असेही संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. काही हटके व्हिडीओज्मधूनही मतदान करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे, त्यात ‘टिकटिक वाजते डोक्यात...’ या गाण्याचा एक विडंबनात्मक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजतो आहे. (प्रतिनिधी)