लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :मतदान कार्डवरील एकसारखा क्रमांक असणे याचा अर्थ झालेले मतदान बोगस आहे, असा होत नसल्याचा दावा रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केला.
दोन वेगवेगळ्या राज्यांत एकसारखे मतदान ओळख क्रमांक असल्याची बाब समोर आल्यानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले. काही मतदारांचे मतदार छायाचित्र असलेले ओळखपत्र (ईपीआयसी) एकसारखे असू शकते. मात्र, विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रासह इतर तपशील वेगवेगळे असतात. त्यामुळे बोगस मतदान करणे शक्य नाही. ईपीआयसी नंबर काही जरी असला तरी मतदाराला त्याच्या राज्यातील निश्चित केंद्रावरच मतदान करता येते, असे आयोगाने म्हटले.
‘ईआयओएनटीआय’ प्रणाली काय आहे?
बनावट नोंदी काढून टाकण्यासोबतच एका मतदारसंघातून दुसरीकडे स्थलांतरित झालेल्या मतदारांचा समावेश करण्यासोबतच निवडणूक व्यवस्था योग्य प्रकारे राखता यावी, यासाठी ईआयओएनटीआय प्रणाली मदत करत असल्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर दिली आहे.