काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मतचोरीच्या मुद्यावरून भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपावर सातत्याने गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, आजही राहुल गांधी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात मतचोरी झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेमधून त्याचे पुरावे सादर केले. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप करताना येथे हजारो मतदार वाढल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघामध्येही मतचोरी झाली असून, येथे ६ हजार ८५० मते वाढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रातील राजूरा मतदारसंघातही मतचोरीचं असंच उदाहरण दिसून आलं. येथे ६ हजार ८५० मतदार नियोजनबद्दरीत्या वाढवण्यात आले. कर्नाटकमधील आलंद येथे मतदार घटवण्यात आले. तर महाराष्ट्रातील राजुरा येथे मतदार वाढवण्यात आले. दोन्हीही मतचोरीचेच प्रकार आहेत. मात्र यामागील कार्यपद्धती सारखीच आहे. यात ज्यांची नावं यातून वगळली त्यांनाही माहिती नाही आहे आणि ज्यांची जोडली त्यांनाही याची माहिती नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. कर्नाटकच्या आळंद येथे ६०८० मते वगळण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार काढले. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.