२०३० मध्ये विश्वनाथन होणार देशाचे सरन्यायाधीश! एवढी वर्षे आधीच कसे काय ठरते...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 02:00 PM2023-05-17T14:00:47+5:302023-05-17T14:01:07+5:30
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच ज्येष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन आणि इतर काहींच्या नावावर तत्कालीन CJI लळीत यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्ट कॉलेजियममध्ये शिक्कामोर्तब होणार होते.
नवी दिल्ली: सीजेआय डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यांच्या कॉलेजियमने केंद्राकडे वरिष्ठ अॅडव्होकेट के. व्ही. विश्वनाथन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनविण्याची शिफारस केली आहे. याशिवाय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांना देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मिश्रा हे जे. बी. पारदीवाला यांचे उत्तराधिकारी बनू शकतात, त्यांचा कार्यकाळ ९ महिन्यांचा असणार आहे. मिश्रा यांच्या न्यायमूर्ती बनण्याने छत्तीगढला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व मिळणार आहे. हे राज्य बनून २३ वर्षे झाली आहेत.
न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि एम. आर. शहा यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात 2 पदे रिक्त आहेत. याच्या दुसऱ्याच दिवशी कॉलेजियमने न्यायाधीशांसाठी दोन नावांची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कसे ठरतात...
सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश सरन्यायाधीश होऊ शकेल की नाही, हे त्यांच्या शपथेवरच ठरत असते. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. जेव्हा एखादे CJI निवृत्त होतात तेव्हा त्यावेळेस सर्वात वरिष्ठ असणारे न्यायाधीश CJI होतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शपथविधीच्या आदेशातही ज्येष्ठतेची काळजी घेतली जाते. जे ज्येष्ठतेमध्ये पहिले आहेत, त्यांना प्रथम शपथ दिली जाते. जे जज एकाच दिवशी शपथ घेतात त्यांच्यातही जो पहिला शपथ घेतो तो सिनिअर असतो.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच ज्येष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन आणि इतर काहींच्या नावावर तत्कालीन CJI लळीत यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्ट कॉलेजियममध्ये शिक्कामोर्तब होणार होते. मात्र या प्रस्तावावर खुली चर्चा करण्याऐवजी ललित यांनी थेट कॉलेजियम सदस्यांकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याला आताचे सीजेआय चंद्रचूड व एस. ए. नजीर यांनी आक्षेप घेतला. यामुळे विश्वनाथन यांच्या नावाची शिफारस करता आली नाही.