डायरी, कॅलेंडरऐवजी एलईडी बल्ब भेट द्या -पंतप्रधानांचे आवाहन
By Admin | Updated: January 6, 2015 02:37 IST2015-01-06T02:37:26+5:302015-01-06T02:37:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त भेटवस्तू म्हणून डायरी व कॅलेंडर अशा वस्तू देण्याऐवजी एलईडी बल्ब देण्याचे आवाहन सोमवारी केले.

डायरी, कॅलेंडरऐवजी एलईडी बल्ब भेट द्या -पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली : विजेची मोठ्या प्रमाणावर बचत करणाऱ्या एलईडी बल्बला ‘प्रकाश पथ’ असे संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त भेटवस्तू म्हणून डायरी व कॅलेंडर अशा वस्तू देण्याऐवजी एलईडी बल्ब देण्याचे आवाहन सोमवारी केले.
घरगुती वीज बचत योजनेअंतर्गत वीज ग्राहकांना एलईडी बल्बचे स्वस्त दरात वितरण करण्याची, तसेच देशभरात घरे आणि रस्त्यांवर प्रकाशासाठी एलईडी बल्बचा वापर करून वीज बचत करण्याची राष्ट्रीय योजना सरकारने आखली आहे. दिल्लीत साऊथ ब्लॉकमधील इमारतीत पारंपरिक बल्बच्या जागी स्वत:च्या हाताने एलईडी बल्ब बसवून मोदी यांनी या योजनेचा प्रतिकात्मक शुभारंभ केला.
यावेळी बोलताना मोदी यांनी वरील आवाहन केले. कंपन्या आपल्या भागधारकांना लाभांशासोबतही एलईडी बल्ब देऊ शकतात, असेही त्यांनी सुचविले.
वीज बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून त्यास जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची आवश्यकता प्रतिपादित करताना पंतप्रधान म्हणाले की, वीज निमिर्तीपेक्षा वीज बचत करणे अधिक किफायतशीर आहे; परंतु प्रत्यक्षात वीजनिर्मितीपेक्षा वीज बचत करणे अधिक कठीण आहे. कारण वीजनिर्मिती करणारी कंपनी मोठ्या प्रमाणावर वीज तयार करू शकते; पण तेवढ्या विजेची बचत करायचे म्हटले, तर त्यासाठी कोट्यवधी ग्राहकांचे सक्रिय सहकार्य लागते.
या जनआंदोलनात सेलिब्रिटी व प्रतिष्ठित नागरिकांना सामील करून घेतले जावे, असे सांगून मोदी म्हणाले की, वीज बचत हे राष्ट्रप्रेमाचे काम आहे, कारण त्यामुळे देशाचा आयात खर्च कमी होईल. शिवाय त्यामुळे पर्यावरण रक्षण होत असल्याने ती समाजसेवाही आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
ऊर्जा बचत... विजेची बचत करण्यासाठी घरी आणि रस्त्यांवर एलईडी दिवे वापरण्याच्या मोहिमेचे उद््घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत सोमवारी झाले. यावेळी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग उपस्थित होते.
यासाठी ग्राहकाकडून सुरुवातीस फक्त १० रुपये रोख घेतले जातील व त्यानंतर त्याच्या वीज बिलातून पुढील १२ महिने दरमहा १० रुपये वसूल केले जातील. अशा प्रकारे प्रत्येक एलईडी बल्ब खरेदीमागे ग्राहकाचे १३ रुपये वाचतील. शिवाय वीज बचतीने वीज बिल कमी येईल ते वेगळेच. या बल्बची तीन वर्षांची वॉरन्टी असेल.
१० रुपयांत
एलईडी बल्ब!
दिल्लीपासून सुरू करण्यात आलेली ही योजना येत्या मार्चपासून टप्प्याटप्प्याने देशभर राबवून पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत देशातील १०० शहरांमध्ये घरे व रस्त्यांवर प्रकाशासाठी एलईडी बल्ब बसविण्याचे उद्दिष्ट आहे.
एलईडी बल्ब पिवळट प्रकाश देणाऱ्या साधारण दिव्यांच्या तुलनेत ५० पट अधिक व सीएफएल दिव्यांच्या तुलनेत आठ ते १० पट अधिक काळ टिकतात. त्यामुळे किमतीच्या दृष्टीने एलईडी बल्बचा सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी दीर्घकालीन वीज बचतीच्या दृष्टीने ते वास्तवात स्वस्त पडतात.