अंतराळातील लघुग्रहाला विश्वनाथन आनंदचे नाव
By Admin | Updated: April 3, 2015 12:17 IST2015-04-03T12:09:49+5:302015-04-03T12:17:39+5:30
बुद्धिबळात भारताचा झेंडा रोवणारा विश्वनाथन आनंद यांची महती आता थेट अंतराळात पोहोचली असून मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये आढळलेल्या एका लघुग्रहाचे 'विशी आनंद ४५३८' असे नाव ठेवण्यात आले आहे.
अंतराळातील लघुग्रहाला विश्वनाथन आनंदचे नाव
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ३ - बुद्धिबळात भारताचा झेंडा रोवणारा विश्वनाथन आनंद यांची महती आता थेट अंतराळात पोहोचली आहे. अमेरिकेतील लघुग्रह केंद्राने मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये आढळलेल्या एका लघुग्रहाचे 'विशी आनंद ४५३८' असे नामकरण केले आहे. विश्वनाथन आनंदच्या या अंतराळ भरारीने भारतीय क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये १० ऑक्टोबर १९८८ मध्ये एक लघुग्रह आढळला होता. जपानचे केन्झो सुझूकी यांनी या ग्रहाचा शोध लावला होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या लघुग्रहाला नाव देण्यात आले नव्हते. लघुग्रहांचा अभ्यास करणा-या अमेरिकेतील लघुग्रह केंद्राचे सदस्य मायकेल रुडेन्को हे स्वतः बुद्धिबळाचे चाहते असून या लघुग्रहाला विश्वनाथन आनंदचे नाव द्यावे असा प्रस्ताव रुडेन्को यांनी मांडला होता. या प्रस्तावाला अंतराळ संघटनेने मान्यता दिल्याने या लघुग्रहाचे नामकरण विशी आनंद ४५३८ असे करण्यात आले. पाच वेळा जगज्जेतेपद पटकावणारा विश्वनाथन आनंद हा उत्तम बुद्धिबळपटू आहे. त्याचसोबत तो एक चांगला व्यक्ती असून अंतराळ क्षेत्राचीही त्याला आवड आहे. म्हणूनच या ग्रहाला मी त्याचे नाव देण्याची शिफारस केली असे रुडेन्को यांनी सांगितले. या सन्मानाविषयी विचारले असता विश्वनाथन आनंद हसतमुखाने म्हणतो, मी परग्रहावरुन आल्याचे माझी पत्नी मला चिडवते. आज यावर शिक्कामोर्तब झाले.
सुर्यमालेत साडे सहा लाखांहून अधिक लघुग्रह असून यातील अनेक लघुग्रहांना विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची नावे देण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रात बुद्धिबळमधील माजी विजेता अनातोली कारपोव्ह, क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन, आर्सनलचे फुटबॉल प्रशिक्षक आर्सन वेन्गर, टेनिसपटू रॉजर फेडरर, राफेल नादाल यांची नावे लघुग्रहांना देण्यात आली आहे.