अमेरिकन पर्यटकांना ‘व्हिसा आॅन अराइव्हल’?

By Admin | Updated: September 22, 2014 03:13 IST2014-09-22T03:13:54+5:302014-09-22T03:13:54+5:30

अमेरिकन पर्यटकांना ‘व्हिसा आॅन अराइव्हल’ (आगमनानंतर व्हिसा) सुविधा देण्याच्या प्रस्तावावर भारताने सध्या काम चालवले आहे़

Visas and Arrivals for American tourists? | अमेरिकन पर्यटकांना ‘व्हिसा आॅन अराइव्हल’?

अमेरिकन पर्यटकांना ‘व्हिसा आॅन अराइव्हल’?

नवी दिल्ली : अमेरिकन पर्यटकांना ‘व्हिसा आॅन अराइव्हल’ (आगमनानंतर व्हिसा) सुविधा देण्याच्या प्रस्तावावर भारताने सध्या काम चालवले आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन दौऱ्यादरम्यान याबाबत घोषणा केली जाऊ शकते़
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी ‘व्हिसा आॅन अराइव्हल’ प्रस्तावाला अंतिम रूप देता यावे, यासाठी गृहमंत्रालयाने अतिरिक्त काम (ओव्हरटाईम) चालवले आहे़ पर्यटन मंत्रालयासोबतच्या यासंदर्भात सल्लामसलत सुरूआहे़ ज्या अमेरिकन नागरिकांचे भारतात कुठेही घर वा व्यवसाय नाही़ केवळ भारतात पर्यटन, भटकंती आणि मित्रमंडळींची अनौपचारिक भेट हेच ज्यांच्या भेटीचे प्रयोजन आहे, अशा अमेरिकन पर्यटकांना ‘व्हिसा आॅन अराइव्हल’ची सुविधा दिली जाऊ शकते़ नव्या प्रस्तावाअंतर्गत अशा पर्यटकांना भारतात ३० दिवस थांबण्याची मुभा असू शकते़ विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जानेवारी २०१० मध्ये पाच देशांसाठी ‘व्हिसा आॅन अराइव्हल’ची सुविधा देण्यात आली होती़ यानंतर या सेवेचा विस्तार करण्यात आला होता़ सध्या फिनलँड, जपान, लग्जमबर्ग, न्यूझीलंड, सिंगापूर, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, लाओस, म्यानमार, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया या ११ देशांतील नागरिकांना ही सुविधा देण्यात आली आहे़ भारत-अमेरिका राजनैतिक सहकारी असूनही उभय देशांत अशी कुठलीही सुविधा तूर्तास नाही़ एका अंदाजानुसार, दरवर्षी सुमारे १० लाख अमेरिकन पर्यटक भारतात येतात़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Visas and Arrivals for American tourists?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.