ओडिशातील भुवनेश्वर येथील एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्न सोहळ्यादरम्यान असा राडा झाला की, सगळ्यांनाच मंडप सोडून पोलीस स्टेशन गाठावे लागले. या व्हिडीओमध्ये लग्नातील सगळ्याच मंडळींचा गोंधळ उडालेला दिसत आहे. या लग्नातील वराने एक तरुणीला लग्नाचं वचन देऊन धोका दिल्यानं, ही तरुणी पोलिसांना सोबत घेऊन थेट लग्न मंडपात पोहोचल्याचं बोललं जात आहे.
नेमकं काय झालं?
रविवारी रात्री भुवनेश्वरमधील धौली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका लग्नात गदारोळ झाल्याची घटना घडली. एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जाऊन तरुणीने केलेल्या राड्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या तरुणीने म्हटले की, ज्या तरुणाचे लग्न सुरू होते त्याने आधीच आपल्याशी साखरपुडा केला होता. त्याचे तरुणीशी लग्न होणार होते. मात्र, तिला कशाचीही कल्पना न देता या तरुणाने दुसऱ्याच मुलीशी लग्नाचा घाट घातला होता. यामुळेच तरुणीने पोलिसांना सोबत घेऊन लग्न मंडप गाठला.
तरुणीने जमलेल्या वऱ्हाडी मंडळींसमोरच नवरदेवावर मानसिक छळ आणि धोका दिल्याचा आरोप केला. या रिलेशनशिपदरम्यान तरुणाने आपल्याकडून ५ लाख रुपये देखील घेतल्याचा दावा तरुणीने केला आहे. तरुणीचा रुद्रावतार बघून जमलेली सगळी मंडळी गोंधळून गेली. यानंतर मंडपात मोठा हल्लाकल्लोळ झाला. अखेर नवरदेवाला बोहल्यावरून उतरवून पोलीस स्टेशनला चौकशीसाठी नेण्यात आले.
लग्नातच नवरदेवाची धुलाई!
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तरुणी नवरदेवाला मारताना दिसली आहे. तर, लोक तिला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. कोणतेही स्पष्टीकरण न देता संबंध तोडल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. ते दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधी त्याने तिचे कॉल आणि मेसेज दुर्लक्षित केले, असे तरुणीने म्हटले आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.