छत्तीसगडमध्ये एका व्यक्तीने भल्यामोठ्या अजगराला त्याच्या दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी वन विभागाने पुढील चौकशी सुरू केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती भल्यामोठ्या अजगराला त्याच्या दुचाकीला बांधून फरफटत नेताना दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार पाठीमागून जाणाऱ्या वाहनातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच, अनेकांनी स्थानिक प्रशासन आणि वन विभागाकडून यावर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी वन विभागाने चौकशी सुरू केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना जंगलाजवळ घडली, जिथे संबंधित व्यक्तीला हा अजगर दिसला. हा अजगर कोणालाही इजा करू नये म्हणून तो अजगराला गावापासून लांब जंगलात सोडण्यासाठी घेऊन जात होता, असे सांगितले जात आहे. पंरतु, प्राण्यांना अशाप्रकारे फरफटत घेऊन जाणे कायदेशीर गुन्हा आहे.