Vir Chakra Award List: ऑपरेशन सिंदूरवेळी आपल्या असामान्य शौर्याचा परिचय देणाऱ्या हवाई दलाच्या यौद्ध्यांना लष्करी पदक देऊन सलाम करण्यात आला आहे. हवाई दलाच्या ९ लढाऊ वैमानिकांना लष्करातील प्रतिष्ठेचे वीर चक्र पदक जाहीर झाले आहे. त्या नऊ लढाऊ वैमानिकांची नावेही घोषित करण्यात आली आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय हवाई दलाच्या नऊ लढाऊ वैमानिकांना त्यांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीबद्दल लष्करी सन्मान जाहीर झाला आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी या ९ वैमानिकांनी पाकिस्तानातील मुरिदके आणि बहावलपूर आणि पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर अचूक हल्ला करत जबर घाव केला होता.
वीर चक्र प्राप्त ९ लढाऊ वैमानिक कोण?
युद्धाच्या काळात आपल्या धाडसाचा प्रत्यय देत कामगिरी करणाऱ्या जवानांना विशेष लष्करी पदकांनी सन्मानित केले जाते. लष्करातील सर्वोच्च पदकांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे असलेले वीर चक्र पदक भारतीय हवाई दलाच्या ९ लढाऊ वैमानिकांना जाहीर झाले आहे.
१) कॅप्टन रणजित सिंग सिधू
२) कॅप्टन मनीष अरोरा
३) कॅप्टन अनिमेश पाटणी
४) कॅप्टन कुणाल कालरा
५) विंग कमांडर जॉय चंद्रा
६) स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार
७) स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग
८) स्क्वाड्रन लीडर रिझवान मलिक
९) फ्लाईट लेफ्टनंट आर्शवीर सिंह ठाकूर
पाकिस्तानची सहा विमाने भारतीय हवाई दलाने पाडली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते.
भारताच्या दहशतवादी अड्ड्यांवरील कारवाईनंतर पाकिस्तानी लष्कराने भारतातील काही ठिकाणांवरही हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते, पण भारतीय हवाई दलाने हे हल्ले निष्प्रभ ठरवले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची पाच लढाऊ आणि एक मोठे विमान पाडले होते.
ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारतीय हवाई दलाने आणि जवानांनी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल विशेष लष्करी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.