पटेल आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
By Admin | Updated: April 18, 2016 02:40 IST2016-04-18T02:40:00+5:302016-04-18T02:40:00+5:30
पटेल समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देणे आणि अटकेत असलेल्या नेत्यांची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी पटेल समाजाने रविवारी आयोजित केलेल्या विशाल रॅलीला

पटेल आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
मेहसाणा : पटेल समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देणे आणि अटकेत असलेल्या नेत्यांची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी पटेल समाजाने रविवारी आयोजित केलेल्या विशाल रॅलीला हिंसक वळण मिळाले. आंदोलनकर्त्यांनी दोन इमारतींना आग लावली आणि पोलिसांच्या अनेक वाहनांची तोडफोड केली. यानंतर गुजरातच्या मेहसाणा येथे संचारबंदी लागू करण्यात येऊन मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली.
‘सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मेहसाणात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात मोबाईल इंटरनेट सेवाही बंद केली जाईल. हिंसक जमावाने दोन शासकीय इमारतींना आग लावली. दगडफेकीत उपविभागीय दंडाधिकारी आणि महसूल अधिकारी जखमी झाले,’ अशी माहिती मेहसाणाचे जिल्हाधिकारी लोचन सेहरा यांनी दिली.
आंदोलकांनी भारतीय अन्न महामंडळाचे (एफसीआय) गोदाम आणि जिल्हा कार्यालय जाळले. यासंदर्भात १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या हिंसाचारात ५ पोलीस आणि २५ आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. मेहसाणातील घटनेचे पडसाद सुरत येथेही उमटले. रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या पटेल समाजाच्या ४३५ लोकांना पोलिसांनी अटक केली. सुरत आणि राजकोट येथेही खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
मेहसाणा येथे पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा वापर केला. सरदार पटेल ग्रुपने जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार हे आंदोलक मोधेरा चौकाजवळ मोठ्या संख्येत गोळा झाले होते.
पोलीस कारवाईत सरदार पटेल ग्रुपचे नेते लालजी पटेल हेही जखमी झाले. दरम्यान, सरदार पटेल ग्रुप आणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलनाने आज सोमवारी गुजरात बंदचे आवाहन केले आहे.