जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, 1 ठार 9 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 16:22 IST2016-02-19T16:22:01+5:302016-02-19T16:22:01+5:30
आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून पोलीसांच्या गोळीबारात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे

जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, 1 ठार 9 जखमी
>ऑनलाइन लोकमत
रोहतक (हरयाणा), दि. 19 - आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून पोलीसांच्या गोळीबारात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जवळपास पाच हजारांच्या जमावानं केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागलं आहे. या जमावानं हरयाणाचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घराला आग लावल्याचं वृत्त आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात 1 ठार तर नऊ जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
जमावानं इन्स्पेक्टर जनरल यांच्या कार्यालयावरही दगडफेक केली आहे. पोलीसांनी या ठिकाणच्या जमावाला पांगवण्यासाठीही गोळीबार केल्याचे वृत्त आहे.
जमावानं रस्त्यावर उभ्या असलेल्या 15 कार व 3 बसेसची तोडफोड केली आहे. काही ठिकाणी तर जमाव इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसक झाला की पोलीसांनीही पळ काढला व नंतर अधिक कुमकीने पोलीस दाखल झाले.
जाट समाजाचं आरक्षणांचं आंदोलन हरयाणामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरत असल्याचे वृत्त असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अपयश आल्याचे व तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे.