काश्मीरमध्ये हिंसक उद्रेक, जमावाने केली पोलिसाची हत्या
By Admin | Updated: July 10, 2016 17:45 IST2016-07-10T17:45:56+5:302016-07-10T17:45:56+5:30
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला चकमकीत जवानांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खो-यात उफाळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही.

काश्मीरमध्ये हिंसक उद्रेक, जमावाने केली पोलिसाची हत्या
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १० - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला चकमकीत जवानांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खो-यात उफाळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. रविवारी हिंसाचाराच्या घटनांमध्ये तीन जण ठार झाले. यात एका पोलिसाचा समावेश आहे. काश्मीर खो-यातीला मृतांचा आकडा आता १८ झाला असून, २०० जण हिंसक आंदोलनात जखमी झाले आहेत.
काश्मीरमध्ये अनेक भागात संचारबंदी असून, मोबाईलमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून, यात्रेकरुंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
रविवारी सकाळी पुलावामाच्या नेवा भागात सुरक्षा जवान आणि आंदोलकांच्या चकमकीत इरफान अहमद मलिक हा १८ वर्षांचा युवक मरण पावला. अनंतनाग जिल्ह्यात संगममध्ये जमावाने पोलिसांची बंकर व्हॅन झेलनदीमध्ये ढकलून दिली. यात वाहनचालक फिरोझ अहमद ठार झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दुस-या एका घटनेत शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी पुलवामा तराल भागात रहाणा-या हेड कॉन्स्टेबलच्या घरात घुसून दोन्ही पायांमध्ये गोळया घातल्या. शनिवारी रात्री जमावाने दामहाल हांजीपोरा भागात पोलिस स्थानकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तीन पोलिस बेपत्ता असून अजून त्यांचा शोध लागलेला नाही अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री नईम अख्तर यांनी दिली.