Violence in West Bengal, Tamilnadu, lathiar, firing | पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये हिंसाचार, लाठीमार, गोळीबार
पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये हिंसाचार, लाठीमार, गोळीबार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. एका जमावाने माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर दगडफेक केल्याने त्यांना एका मतदान केंद्रात जाऊन बसावे लागले, तर वाहनचालक घाबरून पळून गेला. त्यानंतर ते वाहन पेटवून देण्यात आले.
बंगालमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर चोपरा विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर सोडला आणि नंतर हवेत गोळीबारही केला. यात कोणीही जखमी झाले नाही. तेथील एका गावातील मतदार मतदान करण्यासाठी निघाले असता, त्यांना विशिष्ट पक्षाच्या लोकांनी जाण्यापासून अडवले आणि परत घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी रस्ता अडवून ठेवला. त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना, त्यांच्यावर काही मंडळींनी क्रूड बॉम्बही फेकले. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी आणि जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.
तरीही जमाव जाण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि शीघ्र कृती दलालाही पाचारण केले. त्यानंतर मात्र तो जमाव निघून गेला. रायगंज मतदारसंघाच्या क्षेत्रात एका जमावाने स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही मारहाण केली. पोलीस तिथे लगेच पोहोचले. त्यामुळे पत्रकाराची सुटका झाली. मात्र त्याला फार मार
लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर व श्रीनगर मतदारसंघांमध्येही आज मतदान झाले. उधमपूरमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. श्रीनगरमध्ये मात्र सुमारे १६ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. तिथे सकाळपासूनच अतिशय संथ गतीने मतदान सुरू होते. सकाळी ११ वाजेपर्यंत जेमतेम २ ते ३ टक्केच मतदान झाले होते. सकाळी महिला मतदारच प्रामुख्याने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसत होते. मतदानाच्या काळात काश्मीर खोºयात हिंसाचार मात्र झाला नाही.
>कार्यकर्ते भिडले
तामिळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द केली असली तरी तेथील अंबुर व गुडियातम विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. या दोन्ही ठिकाणी अण्णा द्रमुक व एएमएमकेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून त्या जमावाला पांगवावे लागले. तिथे निमलष्करी दलांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे सांगण्यात आले. त्याआधी सकाळी अण्णाद्रमुकवर बुथ बळकावून खोटे मतदान केल्याचा आरोप द्रमुकचे सरचिटणीस एम. के. स्टॅलिन यांनी केला होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याचा इन्कार केला. कुठेही बुथ बळकावण्याचे प्रकार झालेले नाहीत, असे अधिकाºयांनी सांगितले. तामिळनाडूत मतदानाला आलेले तीन वृद्ध मरण पावल्याचे वृत्त आहे.


Web Title:  Violence in West Bengal, Tamilnadu, lathiar, firing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.