पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज भागात वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना अचानक हिंसक वळण लागले, यामध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. शुक्रवारी मुर्शिदाबादमध्येही हिंसाचार झाला होता, या हिंसाचारात आतापर्यंत ११८ लोकांना अटक करण्यात आली आहे.
परिस्थिती पाहता पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तर काही भागात सीमा सुरक्षा दलाची मदतही घ्यावी लागली. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्रीय सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती...
शनिवारी दुपारी शमशेरगंजच्या जाफराबाद भागातील परिस्थिती आणखी बिकट झाली. एका हिंसक जमावाने अचानक गावावर हल्ला केला. या हल्ल्यात, एकाच कुटुंबातील दोन सदस्यांची - वडील आणि मुलगा - निर्घृण हत्या करण्यात आली.
शुक्रवारी, नमाजानंतर, मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. शमशेरगंजला लागून असलेल्या धुलियान भागात, निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ रोखला, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली आणि काही वाहनांना आग लावली. यादरम्यान, किमान १० पोलिस जखमी झाले. काही पोलिसांना जीव वाचवण्यासाठी मशिदीत आश्रय घ्यावा लागला. शनिवारी, हिंसाचार धुलियानपर्यंत पसरला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराचा वापर केला.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, "आम्ही असा कायदा बनवला नाही यावरुन लोक नाराज आहेत. हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की हा कायदा बंगालमध्ये लागू केला जाणार नाही. मग हे दंगे का?, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, भाजपने या मुद्द्यावरून ममता सरकारला घेरले. बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले, "जर भाजप सत्तेत आली तर ते पाच मिनिटांत अल्पसंख्याकांवरील अशा प्रकारची गुंडगिरी आणि हिंसाचार थांबवतील.