West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये नवीन वक्फ कायद्याविरुद्ध पुन्हा हिंसक आंदोलन झाले. मुर्शिदाबादनंतर पश्चिम बंगालमधील आणखी एका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. सोमवारी दक्षिण २४ परगणा येथे इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट केली आणि वाहनांची तोडफोड करत त्यांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे आता परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायद्यासोबत कुणी खेळू नका म्हणत शांततेचे आवाहन केले आहे.
वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मोटारसायकली जाळल्या आणि पोलिस बस उलटवली. गेल्या आठवड्यात मुर्शिदाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर तीन लोकांचा मृत्यू झाला होता आणि २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. मुस्लिमबहुल मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. तसेच घरे आणि दुकाने पेटवून देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलत बळाचा वापर केला. त्यानंतर आता दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.
भांगर परिसरात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली. त्यात अनेक लोक जखमी झाले आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. आयएसएफ समर्थक मध्य कोलकात्यातील रामलीला मैदानाकडे जात होते. तिथे सर्वजण वक्फ कायद्याविरुद्धच्या रॅलीत सहभागी होणार होते. मात्र पोलिसांकून या रॅलीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. जमावाकडून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये काही पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला.
कायद्याशी खेळू नका - ममता बॅनर्जी
दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोयला बैसाखीच्या निमित्ताने मुर्शिदाबाद हिंसाचाराबद्दल भाष्य केलं. "कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही. कोणत्याही लोकशाही समाजाचा पाया लोकांच्या आवाजावर आणि त्यांची मते ऐकून घेण्याच्या अधिकारावर अवलंबून असतो. लोकशाही पद्धतीने शांततेत निषेध करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, परंतु कायद्याचे उल्लंघन करण्याचा नाही," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.