विजय मल्ल्यांना कोर्टाचा दणका, पैसे काढण्यास मनाई
By Admin | Updated: March 7, 2016 17:48 IST2016-03-07T14:29:38+5:302016-03-07T17:48:44+5:30
बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना सोमवारी कर्ज वसूली लवादाने दणका दिला आहे.

विजय मल्ल्यांना कोर्टाचा दणका, पैसे काढण्यास मनाई
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना सोमवारी कर्ज वसूली लवादाने दणका दिला आहे. विजय मल्ल्या यांच्या विरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लागत नाही तो पर्यंत त्यांनी दियाजियोकडून मिळणारे ५१५ कोटी रुपये बँक खात्यातून काढू नयेत असे आदेश लवादाने दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ मार्चला होणार आहे.
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत असून, त्यांनी पैशांच्या वसूलीसाठी बंगळूरुच्या कर्ज वसूली लवादाकडे दाद मागितली आहे. या बँकांची सात हजार कोटी रुपयांची देणी थकवल्याचा मल्ल्या यांच्यावर आरोप आहे.
सक्तवसुली संचालनालयाने मल्ल्यांविरोधात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकांकडून कर्ज म्हणून घेण्यात आलेला पैसा विदेशामध्ये धाडण्यात आला का या अंगाने सक्तवसुली संचालनालय चौकशी करण्याची शक्यता आहे.
किंगफिशर एअरलाइन्स बंद पडल्यानंतर बँकांची हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडाली असून बँकांबरोबर एकरकमी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मल्ल्या यांनी म्हटले होते. ही कर्जे माझी व्यक्तिगत नव्हती असा दावा मल्ल्या यांचा आहे. या कर्जांपोटी मला व्यक्तिगतरीत्या जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगत हा माझ्या बदनामीचा कट असल्याचेही मल्ल्या यांनी म्हटले होते.
तपास पथकांशी आपण संपूर्ण सहकार्य करू असे मल्ल्या यांनी म्हटले असून आपण फरार होत नसल्याचे सांगितले. डिएगियो या कंपनीकडून 75 दशलक्ष डॉलर्स घेत युनायटेड स्पिरिट्सच्या अध्यक्षपदावरून मल्ल्या पायउतार झाले आहेत.
मी गेली 28 वर्षे अनिवासी भारतीय असून मला फरार म्हटल्याने वेदना होत असल्याचे सांगत आपण पळून जाणार नाही व तपास पथकांना सहकार्य करू असे मल्ल्या म्हणाले.