नवी दिल्ली- व्हीएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग तीन दिवसांच्या भारत दौऱ्यांवर येत आहेत. आजपासून ४ मार्चपर्यंत ते भारतामध्ये असतील. आशिया-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि चीनचे वाढते दबावाचे राजकारण लक्षात घेता या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. या दौऱ्यामध्ये त्रान दाई क्वांग भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील तसेच ते भारतातील उद्योजकांचीही भेट घेतील.क्वांग यांच्या १८ जणांच्या शिष्टमंडळामध्ये उद्योजक आणि कलाकारांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे काही नेते व मंत्रीही असतील. राष्ट्रपती क्वांग आपल्या भारतभेटीमध्ये बिहारमधील बोधगया या पवित्र तीर्थक्षेत्रालाही भेट देतील. चीनच्या वाढत्या कारवायांना ब्रुनेई, तैवान, मलेशिया, फिलिपाइन्स, व्हीएतनामनेही विरोध केला आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हीएतनामला २०१६ साली भेट दिली होती. या भेटीच्यावेळेस दोन्ही देशांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, अवकाशविज्ञान, दुहेरी करआकारणी अशा विविध विषयांवर १२ करार करण्यात आले होते. २०१७ साली या दोन्ही देशांच्या राजनयिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाली.
व्हीएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग भारताच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 12:54 IST