विधानसभा निवडणुका - भाजपासाठी महत्त्वाच्या 5 घटना
By Admin | Updated: May 19, 2016 16:02 IST2016-05-19T16:01:14+5:302016-05-19T16:02:02+5:30
आसाममधून काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता भाजपाने हिसकावून घेतली आहे तर केरळमध्ये काँग्रेसला डाव्या पक्षांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजपासाठी या विधानसभा निवडणुकीतल्या 5 महत्त्वाच्या घटना

विधानसभा निवडणुका - भाजपासाठी महत्त्वाच्या 5 घटना
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - आसाममधून काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता भाजपाने हिसकावून घेतली आहे तर केरळमध्ये काँग्रेसला डाव्या पक्षांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे. तामिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये जयललिता व ममता बॅनर्जी यांनी सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. भाजपासाठी या विधानसभा निवडणुकीतल्या 5 महत्त्वाच्या घटना:
1 - काऊ बेल्ट ओलांडला सॅफ्रन पार्टीनं
भाजपाची ओऴख आत्ता आत्तापर्यंत काऊ बेल्ट पार्टी किंवा गाईला पूजनीय मानणाऱ्या राज्यांमधील पार्टी अशी होती. मात्र, आसाममध्ये मिळवलेली सत्ता आणि पश्चिम बंगालमध्ये व केरळमध्ये मिळालेले यश बघता काऊ बेल्टच्या पलीकडे उर्वरीत भारतामध्येही पक्षाने हातपाय पसरल्याचे दिसत आहे.
2 - मुख्यमंत्र्याची घोषणा आधीच हवी
लोकप्रिय व भरवशाचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी निवडलेला असेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होतो असे यापूर्वी दिसून आले आहे. सर्बानंद सोनोवाल यांची भाजपाने मुख्यमंत्रीपदासाठी आधीच केलेल्या निवडणुकीमुळे नरेंद्र मोदी विरुद्ध तरूण गोगोई अशी लढत असेल ही काँग्रेसची रणनीती निष्प्रभ ठरली. पुढील वर्षीच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजपाला ठरवावा लागेल असेच हे संकेत आहेत.
3 - नरेंद्र मोदी प्रचारप्रमुख नाहीत हे स्पष्ट झालं
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारचे व भाजपाचे मुख्य आहेत, हे स्पष्ट आहे, परंतु त्यांना त्या त्या राज्यामध्ये प्रचारप्रमुख करू नये हे देखील यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे. त्यांना प्रचारप्रमुख केलं केंद्र सरकारची कामगिरी हा निवडणुकीचा मुद्दा बनतो आणि स्थानिक मुद्यांवरून लक्ष ढळतं. तसेच, स्थानिक पातळीवर हा घरचा तो बाहेरचा अशी हवा विरोधी पक्षांना करता येत नाही.
4 - युतीची ताकद
कुठलीही हवा नसताना निवडणुका जिंकण्यासाठी युती - आघाडी स्थापन करणं महत्त्वाचं ठरतं. आसाम गण परिषद आणि बोडो पक्षांना सोबत घेतल्याचा भाजपाला आसामममध्ये फायदा झाला.
5 - स्थानिक पक्षांचं आव्हान
येत्या निवडणुकांमध्ये भाजपासमोर स्थानिक पक्षांचं आव्हान असेल. उत्तर प्रदेशात समाजवादी व बसपाशी भाजपाचा मुकाबला असेल. फारशी ताकद नसली तरी काँग्रेस व नितिशकुमार हे देखील स्पर्धेत असण्याची शक्यता आहे.