जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.हरियाणाच्या विनय नरवाल याचाही पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनय नेव्हीमध्ये अधिकारी होता. ७ दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी त्याचं हिमांशीशी लग्न झालं होतं. हनीमूनसाठी ते पहलगामला गेले होते. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे.
एटीव्ही स्टँडच्या इरशाद अहमद यांनी एएनआयशी बोलताना नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. "आम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता की आम्हाला बाईक्सची आवश्यकता आहे. अचानक मार्केटमध्ये गोंधळ सुरू झाला आहे. आम्ही घाबरलो. नंतर आम्हाला फोन आला की परिस्थिती सामान्य झाली आहे आणि बचावकार्यासाठी जायचं आहे. त्यानंतर आम्ही सर्व बाईक्स घेऊन बैसरन व्हॅलीकडे निघालो. कारण तेथे कोणतीही गाडी जात नाही, त्यामुळे आम्ही एटीव्ही घेऊन गेलो होतो. आम्ही तेथून मृतदेह घेऊन आलो. पहिला मृतदेह मीच उचलला होता."
नेव्ही ऑफिसर विनय यांच्या पत्नीने घाबरून जाऊ नये म्हणून त्यांना खोटं सांगितल्याचं देखील इरशाद यांनी म्हटलं आहे. "नेव्ही ऑफिसर होते त्यांनाही मीच घेऊन आलो होतो. येताना मी रस्त्यात थांबलो आणि त्यांची नाडी तपासली, पण त्यांचा मृत्यू झाला होता. तरी मी त्यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी यांना रुग्णालयात घेऊन जाईन. मी रुग्णवाहिकेजवळ गेलो. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर ही सर्व परिस्थिती पाहून मी खूप वेळा रडलो" असं इरशाद अहमद यांनी म्हटलं आहे.
हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
विनय नरवालच्या पत्नीने शवपेटीला मिठी मारली. खूप रडली. शेवटी सॅल्यूट करून तिने जयहिंद असं म्हटलं आहे. हरियाणा सीएम नायब सिंह सैनी यांनी व्हिडीओ कॉलवर विनयचे आजोबा हवा सिंह नरवाल यांच्याशी बोलून त्यांचं सांत्वन केलं आहे. विनय त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. विनयच्या आजोबांनी पत्रकारांना सांगितलं की, "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण त्याला व्हिसा मिळाला नाही आणि म्हणूनच तो काश्मीरला गेला."
"लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
आजोबांनी पंतप्रधान मोदींना दहशतवाद संपवण्याचं आवाहन केलं. मूळचा हरियाणाच्या कर्नल जिल्ह्यातील रहिवासी असलेला विनय नरवाल २ वर्षांपूर्वीच नेव्हीमध्ये रुजू झाला होता. विनयला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं. विनयची पत्नी सुरक्षित आहे. या घटनेनंतर विनयच्या मृतदेहाजवळ बसलेल्या त्याच्या पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.