Nayab Singh Saini Video: दिल्लीच्या निवडणुकीमुळे यमुनेचे दूषित पाणी पेटले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना यमुनेचे पाणी पिऊन दाखवा असे आव्हान दिले होते. त्यानंतर सैनी यांनी यमुना ज्या गावातून दिल्लीत प्रवेश करते तिथे जाऊन पाणी तोंडात धरले. त्यानंतर पाणी थुंकले. हे व्हिडीओत दिसल्यानंतर आपने भाजपला तीन सवाल करत घेरले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आम आदमी पक्षाने नायब सिंह सैनी यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात नायब सिंह सैनी पाणी पितात, पण नंतर लगेच थुंकतात, असे दिसत आहे. हा व्हिडीओ दाखवत आपने भाजपला लक्ष्य केले.
यमुनेच्या पाण्यावरून आपने भाजपला घेरले
"हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी त्यांच्या नौटंकीच्या प्रयत्नात यमुनेचा अपमान केला. नायब सैनी हे यमुनेचे पाणी पिऊन पाप लपवण्याचा प्रयत्न करत होते, पण जसं पाणी विषारी वाटलं, तसं त्यांनी ते यमुनेमध्ये थुंकलं", अशी टीका आपने केली आहे.
आपचे भाजपला तीन प्रश्न
आम आदमी पक्षाने यमुनेच्या पाण्यावरून भाजपला तीन प्रश्न केले आहेत. आपने म्हटले आहे की, "जेव्हा नायब सैनी स्वतः अमोनिया असलेलं विषारी पाणी पिऊ शकत नाही, तर दिल्लीकरांना विषारी पाणी का पाजलं जात आहे? भाजपचं राजकारण दिल्लीतील जनतेच्या जिवापेक्षा जास्त गरजेचं आहे का? हरयाणातील भाजपचं सरकार यमुनेमध्ये का विष कालवत आहे?", असे प्रश्न आपने भाजपला केले आहेत.
"भाजपचं खोटं आता चालणार नाही. दिल्लीतील जनतेला विष पाजण्याच्या कटकारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे", अशी टीका आपने केली आहे.
अरविंद केजरीवालांनी हरयाणात यमुना नदीत विषारी पाणी टाकलं जात असल्याचा आरोप केला होता. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी टीका केली. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी पल्ला या गावात येऊन यमुनेचं पाणी पिऊन दाखवा असे आव्हान दिले होते.