'साहेब, माझी पत्नी मुलगा आणून दे म्हणतेय. माझ्या मुलाला जिवंत करा नाही, तर दोषींना शिक्षा द्या', नवजात मुलांचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या एका बापाच्या मागणीने संपूर्ण प्रशासन हादरले. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात. बाप मुलाचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर हा सगळा हादरवून टाकणारा प्रकार समोर आला. जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच मृतदेह घेऊन बाप तिथे गेला आणि मृतदेह दाखवत टाहो फोडला. त्याच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विपिन गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने खासगी रुग्णालयावर आणि तेथील डॉक्टरवर गंभीर आरोप केले. लखीमपूर खिरीतील महेवागंजमध्ये ही घटना घडली. विपिन गुप्ता आधी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटले, त्यांना झालेला घटनाक्रम सांगताना रडू कोसळले.
बाप बाळाचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे
विपिन गुप्ता शुक्रवारी दुपारी लखीमपूर खिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाळाचा मृतदेह घेऊन पोहोचले. त्यावेळी तिथे अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. विपिन गुप्ताबद्दल कळल्यानंतर जिल्हाधिकारी भेटायला आले, त्यावेळी गुप्ता यांनी मृतदेह दाखवताना अश्रू अनावर झाले.
डॉक्टर म्हणाले इथे बाजार लागलेला नाही
विपिन गुप्तांनी आरोप केला आहे की, गोलदार हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीला प्रसुतीसाठी नेण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी वेळीच उपचार केले नाही. पत्नीची प्रकृती जशी जशी बिघडत गेली तसे रुग्णालयाकडून जास्त पैसे मागितले जात होते. आम्ही त्यांनी ८ हजार रुपये दिले आणि बाकीचे पैसे नंतर देतो, ऑपरेशन करा असं म्हणालो. रुग्णालय म्हणाले इथे बाजार लागलेला नाहीये.
पैसे देईपर्यंत मला माझ्या पत्नीलाही भेटू दिलं नाही. पैसे दिल्यानंतर आम्हाला धक्के देत बाहेर काढले. माझी पत्नी मला सारखी म्हणत आहे की, मला बाळ आणून द्या. बाळ मेलंय आता कुठून आणून देऊ, असं सांगताना विपिन गुप्तांना अश्रू अनावर झाले.
गुप्ता यांच्या पत्नी रुबी यांना बिजुआ येथील रुग्णालयात दाखल नेण्यात आले होते. पण, त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर रुबी यांना गोलदार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री अडीच वाजता भरती करण्यात आले.
चुकीच्या औषधामुळे गर्भातच मृत्यू
गुप्ता यांनी सांगितले की, तिथे असलेल्या डॉ. हुकूमा गुप्ता आणि डॉ. मनीष गुप्ता यांनी २५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यावेळी माझ्याकडे पाच हजार रुपयेच होते. तितके जमा केले. पण, उपचार सुरू असतानाच रुबीची तब्येत बिघडू लागली. त्यानंतर गुरूवारी नर्सने रुबीला जबरदस्ती रुग्णालयातून बाहेर काढले.
जेव्हा दुसऱ्या रुग्णालयात तिला नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी सांगितले की, चुकीचे औषध दिल्यामुळे बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आहे. नंतर त्या बाळाला बाहेर काढण्यात आलं.
रुग्णालयाला टाळे
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गोलदार रुग्णालय तातडीने सील करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पाठवून दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुबी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करण्याचे आदेश रुग्णालयाला दिले.
रुबी यांच्या उपचाराचा खर्च जिल्हाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी स्वतः उचलला असून, कुटुंबीयांना धीर दिला. प्रशासन रुग्णालयावर कारवाई करेल, असे आश्वासनही दुर्गा शक्ती नागपाल यांनी विपिन गुप्ता यांना दिले.