वक्फ विधेयकावरून लोकसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप रंगलेले असताना तिकडे राज्यसभेत इमिग्रेशन विधेयकावर बोलताना संजय राऊत भडकले होते.
जेव्हा हे विधेयक पटलावर ठेवण्यात आले तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितले की आमचा देश धर्मशाळा नाहीय, आम्ही बनू देणार नाही. या देशाला धर्मशाळा बनविण्याचा कोणाचा उद्देश नाहीय. पण जर हा देश धर्मशाळा नसेल तर जेलही नाहीय, असे राऊत म्हणत असताना सत्ताधारी बाकावरून बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतले गेले. हे ऐकताच ऐ कोण बोलतोय बाळासाहेब ठाकरे, कोण आहे? असा सवाल करत चुटक्या वाजवत सत्ताधाऱ्यांना सुनावले.
काय आहे, काहीही कमेंट करत राहतात. आप सुनते रहते है, बोलते रहते है, तुम्ही दहा वेळा पक्ष बदलणारे आहात. आम्ही तुमच्यावेळी व्यत्यय आणला का, असा सवाल करत गप्प बसण्यास सांगितले, तसेच माझा टाईम आता सुरु झाल्याचे म्हटले.
दहा वर्षांपासून या देशाच्या लोकांना एकप्रकारच्या तुरुंगात ठेवले गेले आहे. आता जे अधिकृत व्हिसावर येणार आहेत, त्यानाही कदाचित हा कायदा तुरुंगात ठेवू इच्छित आहे. ज्या प्रकारे अटी आणि शर्ती घातल्या आहेत, त्या पाहता पर्यटक येणे बंद करतील अशी टीका राऊत यांनी केली. ट्रम्पनी देखील अवैध राहणाऱ्या भारतीयांना हाता-पायात बेड्या टाकून अमानवीय रित्या भारतात पाठविले. जर या कायद्याने अवैध राहणाऱ्या अमेरिकीला असेच बेड्या घालून वॉशिंग्टनला पाठवावे, हा तुमचा कायदा असला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
देशात रोहिंग्या, बांगलादेशी तीन कोटी आहेत. त्यांच्याविरोधात हे केले पाहिजे. पहिले बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत हे सुरु केले होते. सेक्शन सातमध्ये जो परदेशी नागरिक आला तर तो कुठे राहणार, काय खाणार हे केंद्र सरकार ठरविणार आहे. कलाकार असेल, पत्रकार असेल तर देशातील नेते, राहुल गांधी, सोनिया गांधींना भेटायचे असेल तर त्यांना केंद्र सरकार परवानगी देणार नाही, म्हणजे ते भेटू शकणार नाहीत. हे या कायद्यात असल्याचे राऊत म्हणाले. कसाब समुद्रातून आला, पण त्यांना या लोकांना रोखायचे नाहीय, असा आरोप राऊत यांनी केला.