देहरादून: उत्तराखंडमधील अनेक भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. दरम्यान, उत्तराखंडमधून अनेक धक्कादायक दृष्य समोर आले आहे. हे दृष्य पाहून तुमचाही थरकाप उडेल. येथील आसन नदीत एक व्यक्ती वाहून गेली, मात्र एका झाडाच्या फांदीने त्या तरुणाचा जीव वाचवला. बराच वेळानंतर स्थानिकांनी त्या तरुणाला सुखरुप बाहेर काढले.
नदीच्या प्रवाहात अडकला तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, देहरादूनजवळील सेलाकुई परिसरातील आसन नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यादरम्यान एक व्यक्ती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. मात्र जीव वाचवण्यासाठी त्याने एका झाडाच्या फांदीला घट्ट पकडले आणि मदतीसाठी आरडाओरड सुरू केला. स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन रेस्क्यू मोहीम सुरू केली आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
विजेच्या खांबावर चढून जीव वाचवला
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरापासून बचाव करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेला दिसतोय. उत्तराखंडमध्ये आलेल्या पूराने जनजीवन विस्खळीत झाले आहे. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे लोकांना जे काही हाती लागले, त्याचाच आधार घ्यावा लागतोय.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “काल उशिरा रात्री देहरादूनच्या सहस्त्रधारा भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही दुकाने कोसळल्याची दुःखद बातमी मिळाली. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि पोलिस घटनास्थळी पोहोचून राहत व बचाव कार्य करत आहेत. मी सतत स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहे आणि स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ईश्वराकडे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.”