उत्तर प्रदेशातील जालौन येथील एका सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी सर्दी आणि खोकल्याचा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या एका चिमुकल्याला सिगारेट ओढायला लावली. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. डॉक्टरवर कारवाई केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांचा एक मुलगा त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी जालौन जिल्ह्यातील कुठौंद सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) पोहोचला होता. उपचाराच्या नावाखाली तैनात असलेल्या सुरेश चंद्रा नावाच्या डॉक्टरने त्याला सिगारेट ओढण्याचे ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. आधी स्वतः ओढली आणि नंतर मुलाच्या तोंडात सिगारेट दिली आणि त्याला ती ओढायला सांगितली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. यानंतर आरोपी डॉ. सुरेश चंद्र यांची तात्काळ दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली. यासोबतच विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी एनडी शर्मा म्हणाले की, हा व्हिडीओ सुमारे १५ दिवस जुना आहे. यावर कारवाई करत, एसीएमओ यांना त्याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात एका बनावट डॉक्टरला अटक केली होती. त्याने एका आठ वर्षांच्या मुलाला इंजेक्शन दिलं होतं, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) कालू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना विजापूर पोलीस ठाण्यातील पिंडारी गावात घडली. खेळताना एका ८ वर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली. उपचारासाठी डॉक्टरकडे गेला. पण इंजेक्शनमुळे मृत्यू झाला.