बिहारमध्ये असहिष्णूतेवर सहिष्णूतेचा विजय - ममता बॅनर्जी
By Admin | Updated: November 8, 2015 12:12 IST2015-11-08T12:08:30+5:302015-11-08T12:12:56+5:30
बिहारमध्ये असहिष्णूतेवर सहिष्णूतेचा विजय झाला असे सांगत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आहे.

बिहारमध्ये असहिष्णूतेवर सहिष्णूतेचा विजय - ममता बॅनर्जी
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ८ - बिहारमध्ये असहिष्णूतेवर सहिष्णूतेचा विजय झाला असे सांगत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आहे. तर आता फटाके पाकिस्तानमध्ये फुटत आहे की बिहारमध्ये हे अमित शहा यांनी सांगावे असा खोचक टोला आप नेते आशुतोष यांनी लगावला आहे.
बिहार विधानसभेत भाजपाप्रणीत रालोआचा नितीशकुमार यांनी पराभव करत विजयी आघाडी मिळवली आहे. नितीशकुमार पुन्हा सत्तेवर येणार हे स्पष्ट होताच सर्वच पक्षांनी नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे. ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऐतिहासिक विजयासाठी नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे. तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीदेखील नितीशकुमार यांचे अभिनंदन केले. देशात अशा परिस्थितीत तुमचा विजय होणे गरजेचे होते असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. विजय हा नेत्याचा असतो तर पराभव हा पक्षाचा असतो असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सध्या दोन पर्याय आहेत. एकतर त्यांनी पूर्णवेळ पंतप्रधान होऊन देशाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करावे. किंवा त्यांनी भाजपाचे प्रचारमंत्रीपद स्वीकारुन निवडणुकीत भाजपाचा विजय मिळवून द्यावा असा सणसणीत टोला काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी लगावला आहे.