उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 5 आॅगस्टला होणार संपन्न
By Admin | Updated: June 29, 2017 21:57 IST2017-06-29T21:57:50+5:302017-06-29T21:57:50+5:30
भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ आॅगस्ट रोजी संपन्न होईल व त्याच दिवशी मतमोजणीही केली जाईल

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 5 आॅगस्टला होणार संपन्न
ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 29 - भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ आॅगस्ट रोजी संपन्न होईल व त्याच दिवशी मतमोजणीही केली जाईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नसिम जैदी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.
गुप्त मतदान पध्दतीने होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना ४ जुलै रोजी जाहीर होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १८ जुलै असून १९ जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. निवडणूक अटळ ठरल्यास ५ आॅगस्ट रोजी सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संसद भवनात मतदान होईल व त्यानंतर मतमोजणीही त्याच दिवशी संपन्न होईल.
उपराष्ट्रपतीपदाच्या निर्वाचन मंडळात लोकसभेचे निर्वाचित ५४३ + नामनियुक्त २ सदस्य तसेच राज्यसभेचे निर्वाचित २३३ व नामनियुक्त १२ सदस्य अशा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकुण ७९0 सदस्यांचा समावेश आहे. तथापि यापैकी सध्या काही जागा रिक्त आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सलग दोनदा हे पद भूषवले. त्यांचा कार्यकाल १0 आॅगस्ट रोजी संपतो आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतीनंतर उपराष्ट्रपतीपद हे महत्वाचे पद असून राज्यसभेचे पदसिध्द सभापतीपद उपराष्ट्रपती भूषवतात. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएतर्फे गुजराथच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, खासदार हुकूमदेव नारायणसिंग व नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंच्या नावाची राजधानीत चर्चा आहे. विरोधकांतर्फे या पदासाठी कोणाची उमेदवारी जाहीर होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.