संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राज्यघटनेतील कलम ६७(अ) नुसार तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय सल्ल्यानुसार धनखड यांनी राजीनामा दिल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड म्हणाले की, आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आमि वैद्यकीय सल्ल्याचं पालन करून मी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळादरम्यान, मिळालेलं सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांसाठी धनखड यांनी या पत्रामधून राष्ट्रपतींचे आभार मानले आहेत. सोबतच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने केलेल्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत.
जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये पुढे लिहिले की, मला संसदेतील सर्व मान्यवर सभासदांकडून जे प्रेम, विश्वास आणि सन्मान मिळाला, तो माझ्या हृदयात जन्मभर साठून राहील. या महान लोकशाहीमध्ये उपराष्ट्रपती म्हणून मिळालेल्या संधीसाठी मी आभारी आहे. भारताचा आर्थिक विकास आणि अभूतपूर्व परिवर्तनकारी काळाचा साक्षीदार बनणं ही माझ्यासाठी सौभाग्य आणि समानाधानाची बाब आहे. दरम्यान, भारताचा वैश्विक शक्ती म्हणून उदय आणि उज्ज्वल भवितव्याबाबत त्यांनी राजीनाम्यामधून विश्वास व्यक्त केला आहे.
राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात जन्मलेल्या जगदीप धनखड यांनी १९८९ मध्ये खासदार म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पुढे जनता दल, काँग्रेस आणि भाजपा असा प्रवास करत २०१९ मध्ये ते पश्चिम बंगालचे राज्यपाल बनले होते. तर २०२२ मध्ये त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती.