जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान झाले आहे. सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात ७.४५ वाजता निकाल घोषित केला जाणार आहे. अशातच या मतदानाला १३ खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त आहेत. तर १३ खासदारांनी मतदान केलेले नाही. एकूण ७८१ मतदान होणे अपेक्षित होते. परंतू, १३ मते पडलेली नाहीत. यामुळे आता 768 मतांची मोजणी केलाी जाणार आहे. मतदान न करणाऱ्यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि अपक्ष १ अशा खासदारांचा समावेश आहे. एनडीएच्या ४२७ खासदारांनी मतदान केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे उमेदवार आहेत. तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत. सत्ताधारी असल्याने राधाकृष्ण यांचे पारडे जड असले तरी क्रॉस व्होटिंगही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच वायएसआरपीने अचानक आपल्या खासदारांची मते एनडीएला देण्याचे जाहीर केले होते. यामुळे एनडीएची ११ मते वाढणार आहेत. दोन्ही आघाड्यांचे नेते आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. भाजप प्रणित आघाडीला विजयाचा विश्वास असून त्यांनी सेलिब्रेशन डिनरची तयारी सुरु केली आहे.