ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा कालवश
By Admin | Updated: December 2, 2014 10:11 IST2014-12-02T09:30:46+5:302014-12-02T10:11:28+5:30
विनोदी शैलीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा कालवश
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २ - विनोदी शैलीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अंगूर, खट्टा मिठा, चोर के घर चोर या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.
२३ ऑक्टोबर १९३७ मध्ये जन्मलेले देवेन वर्मा यांचे शिक्षण पुणे विद्यापीठातून झाले. महाविद्यालययीन जीवनापासून नाटकांमध्ये सहभागी होणारे देवेन वर्मा हे त्या काळी दिग्गज कलाकारांची मिमीक्री करायचे. उत्तर भारताच्या संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात देवेन वर्मा एकपात्री प्रयोग सादर करत होते व हा प्रयोग बी. आर. चोप्रा यांनी बघितला. यानंतर चोप्रा यांनी देवेन वर्मा यांना धर्मपूत्र या चित्रपटात संधी दिली. १९६१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सपशेल आपटला. चित्रपटातील पदार्पण अपयशी ठरले असले तरी वर्मा यांनी एकपात्री प्रयोग करणे सुरुच ठेवले होते. १९६३ साली प्रदर्शित झालेल्या गुमराह या चित्रपटात देवेन वर्मा यांनी अशोक वर्माच्या नोकराची भूमिका केली होती. ही विनोदी भूमिका प्रेक्षकांनाही भावली व यानंतर देवेन वर्मांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला. एका वेळी तब्बल १६ चित्रपटांसाठी काम करण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पार पाडले होते. दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची कन्या रुपा गांगुली यांच्याशी देवेन वर्मा यांनी विवाह केला.