सराईत गुन्हेगारांकडून वाहनचोरीचे गुन्हे उघड
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
पुणे : शहरातील विविध भागांमधून दुचाकींची चोरी करणा-या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
सराईत गुन्हेगारांकडून वाहनचोरीचे गुन्हे उघड
पुणे : शहरातील विविध भागांमधून दुचाकींची चोरी करणा-या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. संतोष राम कांबळे (वय २१, रा. कासेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. कांबळे याने दुचाकीची चोरी केलेली असून भवानी पेठेतील अरुणकुमार वैद्य स्टेडीयमजवळ तो येणार असल्याची माहिती खब-यामार्फत खडक पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक संजय गायकवाड, शैलेश जगताप, सुरेश गेंगजे, अमोल पवार, अजय थोरात, अशोक माने, महेंद्र पवार यांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.कांबळे याने भवानी पेठेतून ही दुचाकी चोरली होती. त्याच्याकडे चोरीच्या आणखी दोन दुचाकी मिळून आल्या. त्याच्यासोबत ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन साथीदार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई परिमंडळ एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.