नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा वीर सावरकर यांच्यावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात वाद उभा राहिला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या एका कॉलेजला वीर सावरकर नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या २ नव्या कॅम्पस अन् कॉलेजचं भूमिपूजन केले. या नव्या कॉलेजला वीर सावरकर यांचं नाव देण्यात येणार असल्याचं समोर आल्यानंतर काँग्रेसच्या युवक संघटनेने यावर आक्षेप घेतला.
काँग्रेसनं वीर सावरकर यांच्याऐवजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव कॉलेजला द्यावे अशी मागणी केली आहे. याबाबत काँग्रेस युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यात मनमोहन सिंग यांनी शिक्षण आणि प्रशासन यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची आठवण करून दिली आहे. मनमोहन सिंग यांची शैक्षणिक पार्श्वभूमी मोठी आहे. त्यांच्या कारकिर्दीत राईट टू एज्युकेशन एक्ट आणि सेंट्रल यूनिवर्सिटी एक्ट आणले गेले. त्यामुळे नव्या कॉलेजला त्यांचे नाव देणे त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल असं त्यांनी सांगितले.
तर भाजपा केवळ फित कापण्याचं राजकारण करते. गेल्या ११ वर्षात सावरकर यांच्या नावाने कुठलीही योजना भाजपा सरकारने केली नाही. सावरकरांचे इंग्रजांसोबत काय संबंध होते हे देशाला माहिती आहे असं विधान काँग्रेस प्रवक्ते अलोक शर्मा यांनी केले आहे. त्यामुळे वीर सावरकर नावावरून काँग्रेस आणि भाजपा यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
१४० कोटींमध्ये बनणार वीर सावरकर कॉलेज
दरम्यान, दिल्ली विद्यापीठाचं वीर सावरकर कॉलेज नजफगड येथे बनणार आहे. विद्यापीठाच्या पश्चिमी कॅम्पेसपासून ५ मिनिटाच्या अंतरावर हे कॉलेज असेल. या कॉलेजच्या बांधकामासाठी जवळपास १४० कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. या नव्या कॉलेजमध्ये २४ वर्ग, ८ ट्यूटोरियल रुम्स, एक कॅन्टिन, ४० फॅकल्टी रुम, लायब्रेरी आणि कॉन्फरन्स रूम इत्यादी सुविधा असतील. या कॉलेजला वीर सावरकर नाव देण्यात येणार असून त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. वीर सावरकर यांच्याऐवजी मनमोहन सिंग यांचं नाव कॉलेजला देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या युवक संघटनेने केली आहे.