ललित मोदी प्रकरणात वसुंधरा राजेही गोत्यात
By Admin | Updated: June 17, 2015 12:47 IST2015-06-17T10:11:30+5:302015-06-17T12:47:31+5:30
ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी सुषमा स्वराज यांच्यापाठोपाठ वसुंधरा राजे यादेखील अडचणीत सापडल्या आहेत.

ललित मोदी प्रकरणात वसुंधरा राजेही गोत्यात
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी सुषमा स्वराज यांच्यापाठोपाठ वसुंधरा राजे यादेखील अडचणीत सापडल्या आहेत. ललित मोदींच्या इमिग्रेशन कागदपत्रांवर वसुंधरा राजे यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी दिली होती अशी माहिती समोर आली असून भाजपाने सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
सुषमा स्वराज यांनी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींना मदत केल्याचे उघड झाल्यापासून भाजपावर टीका सुरु आहे. आता राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे कुटुंबीय व ललित मोदी यांचे घनिष्ठ संबंधही आता उघड झाले आहेत. ललित मोदींच्या इमिग्रेशन पेपरवर गुप्त साक्षीदार म्हणून राजे यांनी स्वाक्षरी केली होती. याशिवाय ललित मोदी यांच्या कॅन्सरग्रस्त पत्नीला घेऊन वसुंधरा राजे या दोन वेळा पोर्तुगालमध्ये उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या असे समजते. विशेष बाब म्हणजे पोर्तुगालमधील ज्या रुग्णालयात ललित मोदींच्या पत्नीवर उपचार झाले, त्याच रुग्णालयाने राजस्थानमध्येही कर्करोग रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. गोरगरीब कर्करुग्णांवर अल्पदरात उपचार मिळावे यासाठी राजस्थान सरकार व संबंधीत रुग्णालय यांच्यात हा करार झाल्याची माहितीही समोर आली आहे. वसुंधरा राजे यांच्या मुलाच्या कंपनीलाही ललित मोदींनी आर्थिक पाठबळ दिले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
वसुंधरा राजे कुटुंबीय व ललित मोदी यांचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आल्यानंतर भाजपाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. काँग्रेसने वसुंधऱा राजे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोन्ही नेत्यांवर कारवाई करावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.