सदोष मनुष्यवध प्रकरणी वकिलास सक्तमजुरी
By Admin | Updated: March 24, 2015 23:53 IST2015-03-24T23:06:43+5:302015-03-24T23:53:13+5:30
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील २०११ ची घटना

सदोष मनुष्यवध प्रकरणी वकिलास सक्तमजुरी
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील २०११ ची घटना
नाशिक : शेतजमिनीतील विहिरीच्या हिश्श्याच्या कारणावरून झालेल्या एकाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी मंगळवारी आरोपी ॲड़ अरुण शिरोरे यास पाच वर्षे सक्तमजुरी व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे २७ एप्रिल २०११ रोजी ही घटना घडली होती़
जिल्हा न्यायालयातील वकील व आरोपी अरुण रामचंद्र शिरोरे यांनी देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे रामदास विष्णू धामणे, शामकांत विष्णू धामणे व भरत विष्णू धामणे यांच्याकडून शेतजमीन विकत घेतली़ त्यामध्ये एक विहीरदेखील होती़ यानंतर शिरोरे यांनी मोजणीचा अर्ज दिल्याने २७ एप्रिल २०११ रोजी सक्षम अधिकारी शेतजमीन मोजणीसाठी आले़ त्यावेळी शेजारील जमिनीचे मालक तसेच पूर्वाश्रमीचे मालकही हजर होते़ यावेळी श्यामकांत धामणे यांनी शेतजमिनीतील विहिरीत काका खंडेराव यांचाही वाटा असल्याचे शिरोरे यांना सांगितले असता त्यांनी तो नाकारला़
श्यामकांत व शिरोरे हे दोघेही विहिरीच्या काठावर उभे असताना त्यांच्यात वाद झाला़ यानंतर दोघांमध्ये झालेल्या झोंबाझोंबीत शिरोरे यांनी श्यामकांत यांना विहिरीत ढकलून दिल्याने ते इलेक्ट्रिक मोटरच्या फाउंडेशनवर पडले़ यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला़ या प्रकरणी मयत श्यामकांत यांचे भाऊ भरत धामणे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता़
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी सहा साक्षीदार तपासले़ न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी ॲड़ अरुण शिरोरे यास पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत दंडाच्या रकमेतील वीस हजार रुपये फिर्यादीस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले़ दरम्यान, या प्रकरणाचा तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस़ एम़ सय्यद यांनी केला़(प्रतिनिधी)