देशात 2.56 कोटी लोकांना दिली लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:34 AM2021-03-12T05:34:05+5:302021-03-12T05:35:03+5:30

गुरुवारी यंदाच्या वर्षीचे सर्वाधिक रुग्ण : १२६ मृत्यू

Vaccinated 2.56 crore people in the country | देशात 2.56 कोटी लोकांना दिली लस

देशात 2.56 कोटी लोकांना दिली लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशात यंदाच्या वर्षीची कोरोनाच्या नव्या रुग्णांची सर्वाधिक संख्या गुरुवारी आढळून आली. या दिवशी २२८५४ नवे रुग्ण सापडले व १२६ जणांचा बळी गेला.  उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रमाणातही वृद्धी होऊन ते १.६८ टक्के झाले आहे. देशात आतापर्यंत २.५६ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेच्या ४ लाख ७८ हजार सत्रांमध्ये हा पल्ला गाठण्यात आला. गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे बळी गेलेल्यांपैकी ८२.५४ टक्के लोक महाराष्ट्रासह सहा राज्यांतील आहेत. याच कालावधीत १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकही जण मरण पावला नाही. 

याआधी २५ डिसेंबर रोजी २३,०६७ इतके कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ७६ दिवसांनी पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १२ लाख ८५ हजार आहे व १ कोटी ९ लाख ३८ हजार जण बरे झाले. या संसर्गाच्या बळींची संख्या १ लाख ५८ हजारांवर पोहोचली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ८९ हजारांपेक्षा अधिक आहे. त्यांचेप्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत ९६.९२ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४० टक्क्यांवर कायम आहे. बळी गेलेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून जास्त लोक एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त होते.

कोरोनाच्या जादा लसी अमेरिका इतर देशांना देणार
अमेरिकेकडील जादा लसी इतर देशांना वाटणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. जग कोरोनापासून सुरक्षित होत नाही तोवर अमेरिकाही सुरक्षित नसेल याची आम्हाला जाण आहे. अमेरिकी नागरिकांना प्राधान्याने लस देऊन जादा लसींचे जगभरात वाटप करू असेही जो बायडेन म्हणाले. अमेरिेकेत कोरोना साथीने त्रस्त झालेल्यांना मदत देण्यासाठी १.९ ट्रिलियन डॉलर निधी अमेरिकी काँग्रेसने मंजूर केला.

वर्षानंतरही साथ आटोक्यात नाही
कोरोनाची साथ जगभरात पसरल्याची अधिकृत घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी ११ मार्च रोजी केली होती. त्याला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत साथ आटोक्यात आणणे या संस्थेला शक्य झालेले नाही. कोरोना लसीच्या समन्यायी वाटपासाठी जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या प्रयत्नांना अद्यापी यश आलेले नाही. 

 

Web Title: Vaccinated 2.56 crore people in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.