कोटद्वार: उत्तराखंडच्या कोटद्वार शहरातील जिम मालक दीपक कुमार सध्या देशभरात चर्चेत आले आहेत. मुस्लिम दुकानदाराला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातून वाचवताना त्यांनी स्वतःची ओळख ‘मोहम्मद दीपक’ अशी करून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही दीपक कुमार यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
‘सर्वप्रथम मी एक माणूस आहे’
या घटनेदरम्यान दीपक कुमार यांनी आपण कोणत्याही धर्माच्या चौकटीत अडकलेले नसल्याचे सांगितले. “मी हिंदू नाही, मुसलमान नाही, शीख नाही, ख्रिश्चन नाही. सर्वप्रथम मी एक माणूस आहे. मृत्यूनंतर मला देव आणि मानवतेला उत्तर द्यायचे आहे, धर्माला नाही,” असे ते एका व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच दीपक कुमार यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले.
नेमका वाद काय?
ही संपूर्ण घटना 28 जानेवारी रोजी घडली. कोटद्वारमधील मुस्लिम दुकानदार शोएब यांनी आपल्या दुकानाला ‘बाबा ड्रेस’ असे नाव दिले होते. यावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेत दुकानाचे नाव बदलण्याची मागणी केली. याच दरम्यान जिम मालक दीपक कुमार दुकानदाराच्या समर्थनार्थ पुढे आले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दीपक यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी स्वतःचे नाव ‘मोहम्मद दीपक’ असे सांगितले आणि “30 वर्षांपासून चालू असलेल्या दुकानाचे नाव बदलायला लावणे योग्य आहे का?” असा सवालही उपस्थित केला.
व्हायरल व्हिडीओनंतर तणाव वाढला
थोड्या वादावादीनंतर संघटनेचे कार्यकर्ते तेथून निघून गेले. मात्र, 31 जानेवारी रोजी गौ रक्षा दलाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उनियाल यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाचे कार्यकर्ते पुन्हा दुकानासमोर जमले. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी झाली आणि दीपक कुमार यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. त्यांच्यावर ऑनलाइन वादग्रस्त मजकूर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला. यादरम्यान, काही तरुणांची दीपक कुमार यांच्याशी झटापटही झाली.
पोलिसांकडून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल
कोटद्वार पोलिसांनी या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. 30 ते 40 अज्ञात विरोधकांविरोधात सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. स्थानिक वकील अहमद यांच्या तक्रारीवरून शिवीगाळ, जातीय भाषेचा वापर आणि शांतता भंग केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल आहे, तर कमल प्रसाद यांच्या तक्रारीवरून दीपक कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अपमानास्पद भाषा आणि हिंसेची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, कोटद्वार परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
यापूर्वीही झालेला होता वाद
दरम्यान, दुकानाच्या नावावरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. सुमारे अडीच महिन्यांपूर्वीही नाव बदलण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी दुकानदार शोएब यांनी दुकान दुसऱ्या ठिकाणी हलवल्यानंतर नाव बदलण्याचे आश्वासन दिले होते. सुमारे 15 दिवसांपूर्वी दुकान मूळ जागेपासून 30 ते 40 मीटर अंतरावर हलवण्यात आले, तरीही नावावरून पुन्हा विरोध सुरू झाला.
Web Summary : Kotdwar gym owner Deepak Kumar faced opposition for defending a Muslim shopkeeper. Identifying as 'Mohammad Deepak,' his actions sparked debate, praised by Rahul Gandhi. The dispute involved a shop name and led to multiple police complaints and increased tensions.
Web Summary : कोटद्वार में मुस्लिम दुकानदार का बचाव करने पर जिम मालिक दीपक कुमार विवादों में घिरे। 'मोहम्मद दीपक' के रूप में पहचान बताने पर राहुल गांधी ने सराहना की। दुकान के नाम पर विवाद हुआ, जिसके बाद पुलिस में शिकायतें दर्ज हुईं और तनाव बढ़ गया।