उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ सहस्त्रधारा येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली. या घटनेमुळे परिसरातील अनेक दुकाने वाहून गेली असून दोन व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी सविन बन्सल यांनी रात्रीच सूत्रे हाती घेतली. त्यांनी तातडीने विविध विभागांशी संपर्क साधून बचाव पथके घटनास्थळी पाठवली. एसडीआरएफ, एनडीआरएफ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस दल जेसीबी व इतर उपकरणांसह बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. रात्रीच परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
मुख्यमंत्री धामी यांनी व्यक्त केले दुःखउत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. "डेहराडूनच्या सहस्त्रधारा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही दुकानांचे नुकसान झाल्याचे वृत्त समजले. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि पोलीस पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. मी स्वतः स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो," असे ते म्हणाले.
शाळांना सुट्टी जाहीरमुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती पाहता, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डेहराडूनमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. या पावसामुळे आयटी पार्क डेहराडूनमध्ये पाणी साचले असून, अनेक वाहने रस्त्यावर तरंगताना दिसली. बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.