Uttar Pradesh Crime: कानपूर येथे उघडकीस आलेल्या किडनी रॅकेट प्रकरणात धक्कादायक तपशील समोर आले आहेत. एका सरकारी रुग्णालयात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारा व्यक्तीच प्रत्यक्षात एका हॉस्पिटलचा मालक असल्याचे उघड झाल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय नावाचा हा व्यक्ती सरकारी हेलिक्स रुग्णालयात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. त्याचा मासिक पगार सुमारे २० हजार रुपये असतानाही त्याने ‘स्टार हॉस्पिटल’ नावाने रुग्णालय सुरू केले होते. हे रुग्णालय काही काळापूर्वी बंद करण्यात आले असल्याची माहिती असून, एवढ्या कमी उत्पन्नातून त्याने हा व्यवसाय कसा उभा केला, याचा तपास सुरू आहे.
पोलिस तपासात अजयची भूमिका या संपूर्ण किडनी रॅकेटमध्ये महत्त्वाची असल्याचे समोर आले आहे. तो मुख्य आरोपी शिवम आणि इतरांना विविध रुग्णालयांशी जोडण्याचे काम करत होता. गरजू रुग्ण आणि किडनी दाते यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तो सांभाळत असल्याचेही उघड झाले आहे. तपासादरम्यान अजयनेच शिवमची ओळख रोहन आणि नरेंद्र यांच्याशी करून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच तिघांनी पुढे ‘मेडलाइफ’ नावाचे रुग्णालय सुरू केले. या रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांटशी संबंधित पुरावे मिळाल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, या प्रकरणातील व्हिसलब्लोअर आयुषला ऑपरेशननंतर ‘मेडलाइफ’ रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आयुषनेच या रॅकेटचा पर्दाफाश केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या रुग्णालयाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
दरम्यान, अजयच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, त्याची बँक खाती, मालमत्ता आणि संपर्क यांचा तपास केला जात आहे. त्याच्या उत्पन्न आणि संपत्तीतील तफावतही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. पोलिसांनी त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावले असून, पुढील तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात अद्याप सर्व पुरावे समोर आले नसून, पुढील चौकशी आणि तपासानंतरच अटक आणि पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. किडनी रॅकेटच्या या प्रकरणात येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : A security guard in Kanpur, earning little, owned a hospital linked to a kidney racket. He connected patients and donors, raising suspicion. Police investigate his finances and potential involvement after a whistleblower exposed the scheme.
Web Summary : कानपुर में किडनी रैकेट में एक सिक्योरिटी गार्ड अस्पताल का मालिक निकला। कम आय के बावजूद, वह रोगियों और दाताओं को जोड़ता था, जिससे संदेह पैदा हुआ। पुलिस उसकी वित्तीय जांच कर रही है।