अमेरिका म्हणते पाकने जैश-ए-मोहंमद, लष्कर-ए-तोयबाच्या मुसक्या आवळल्या
By Admin | Updated: January 6, 2015 02:32 IST2015-01-06T02:32:32+5:302015-01-06T02:32:32+5:30
पाकिस्तान केरी-लुगर विधेयकांतर्गत साहाय्य पॅकेज मिळविण्यास पात्र असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी प्रमाणित केल्यामुळे पाकला अमेरिकेची भरीव मदत प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिका म्हणते पाकने जैश-ए-मोहंमद, लष्कर-ए-तोयबाच्या मुसक्या आवळल्या
नवी दिल्ली : पाकिस्तान केरी-लुगर विधेयकांतर्गत साहाय्य पॅकेज मिळविण्यास पात्र असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी प्रमाणित केल्यामुळे पाकला अमेरिकेची भरीव मदत प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकने अल-कायदा, तालिबान व लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनांना आपल्या भूभागात, तसेच सीमेपलीकडे कारवाया करण्यापासून रोखले, असा केरींच्या या प्रमाणपत्राचा अर्थ होतो. यामुळे भारतात जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने पाकला केरी-लुगर पॅकेजसाठी पात्र ठरविल्याचे वृत्त टाइम्स नाऊने सोमवारी दिले. केरी-लुगर विधेयकांतर्गत पाकला नागरी साहाय्य पॅकेज देण्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. अल-कायदा, तालिबान व जैश ए मोहंमद, लष्कर ए तोयबासारख्या संलग्न संघटनांना आपल्या भूभागातून कारवाया, तसेच सीमापार हल्ले करण्यापासून रोखणे आदी अटींचा त्यात समावेश आहे.
पाकने या अटींचे पालन केल्याचे अमेरिकी प्रशासनाने प्रमाणित केले तरच पाकला केरी-लुगर विधेयक अर्थात पाकिस्तानसोबतची वाढीव भागीदारी कायदा २००९ अंतर्गत साहाय्यता पॅकेज मिळू शकते. पाकने २०१४ मध्ये या अटी पाळल्याच्या प्रमाणपत्रावर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे प्रमाणपत्र बहाल केल्यानंतर केरी या महिन्यातच व्यूहात्मक चर्चेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहंमदचे प्रमुख हाफीज सईद आणि मसूद अजहर यांनी गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाहीर सभा घेतल्या असताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकला हे प्रमाणपत्र दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)