पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात सैन्य कारवाया केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. मात्र, शनिवारी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला सहमती दिली, याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: घेतले. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांच्यावर युद्धविरामासाठी दबाव आणला, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला त्यांच्यासोबतचा व्यापार संपवण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही देशांनी माघार घेतली आणि युद्धविरामाला सहमती दर्शवली, असेही ट्रम्प म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे भरपूर अण्वस्त्रे आहेत. मला वाटते की आम्ही अणुयुद्ध रोखले आहे. अन्यथा या युद्धात लाखो मारले गेले असते. मी उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचे त्यांच्या कामाबद्दल त्यांचे आभार मानू इच्छतो. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानसोबतचा व्यापार संपुष्टात आणण्याची धमकी देऊन दोन्ही देशांवर दबाव आणला. जर त्यांना अमेरिकेसोबत व्यापार सुरू ठेवायचा असेल तर, त्यांना युद्ध थांबवावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांनी तात्काळ युद्धविरामाला सहमती दर्शवली, असे ट्रम्प म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचा उल्लेख सर्वप्रथम ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या केला. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एक निवेदन जारी केली. भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी पूर्ण युद्धविरामाला सहमती दर्शवली असून तटस्थ ठिकाणी विस्तृत चर्चा सुरू करतील, असे स्पष्ट करण्यात आले.