पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही?; अमेरिकन मासिकाच्या दाव्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:46 PM2019-04-05T13:46:41+5:302019-04-05T13:52:06+5:30

पाकिस्तानच्या ताफ्यातील सर्व एफ-16 विमानं सुरक्षित असल्याचा दावा

US count of Pakistans F 16s fighter jets found none of them missing says us magazine Report | पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही?; अमेरिकन मासिकाच्या दाव्यानं खळबळ

पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही?; अमेरिकन मासिकाच्या दाव्यानं खळबळ

Next

न्यू यॉर्क: पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व एफ-16 विमानं सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्या एका मासिकानं केला आहे. पाकिस्तानचं एफ-16 पाडल्याचा भारताचा दावा चुकीचा असू शकतो, असं 'फॉरेन पॉलिसी' या मासिकानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं मासिकानं हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या दोन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन वृत्त दिल्याचं मासिकानं म्हटलं आहे. 

पाकिस्ताननं अमेरिकेकडून एफ-16 विमानं खरेदी केली होती. या विमानांची मोजदाद केल्यास ती योग्यच असल्याचं दोन अधिकाऱ्यांनी मासिकाला सांगितलं. एक एफ-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा विचारात घेतल्यास पाकिस्तानच्या ताफ्यात एक विमान कमी असायला हवं होतं. मात्र तसं झालेलं नाही, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. यानंतर 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.



27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये आकाशात चकमक झाली. या दरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 मधून पाकिस्तानच्या एफ-16 वर निशाणा साधला. अभिनंदन यांच्या अचून निशाण्यामुळे एफ-16 विमान कोसळलं, अशी माहिती हवाई दलानं पत्रकार परिषदेत दिली. याच पत्रकार परिषदेत हवाई दलानं आमरार क्षेपणास्त्राचे काही तुकडेदेखील दाखवले. पाकिस्तानच्या ताफ्यातील केवळ एफ-16 विमानच आमरार क्षेपणास्त्र डागू शकतं. त्यामुळे पाकिस्ताननं भारताविरोधात एफ-16 चा वापर केला, हे सिद्ध होतं, असा दावा हवाई दलानं केला होता. 



भारताविरोधात एफ-16 विमानाचा वापर केला नाही, असा दावा पाकिस्ताननं केला होता. पाकिस्तानचा तो दावा हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर कपूर यांनी खोडून काढला होता. 'प्रत्येक विमानाचा एक विशिष्ट इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. पाकिस्तानी विमानाकडून मिळालेला सिग्नल हवाई दलानं टिपला. तो एफ-16 शी जुळतो. पाकिस्तानकडे असलेल्या विमानांपैकी केवळ एफ-16 विमान आमरार मिसाईल घेऊन जाऊ शकतं आणि भारतीय हवाई दलानं पाडलेल्या विमानाजवळ आमरार मिसाईलचे अवशेष सापडले आहेत. यावरुन पाकिस्ताननं एफ-16 वापरल्याचं स्पष्ट होतं,' असं कपूर यांनी सांगितलं होतं.

Web Title: US count of Pakistans F 16s fighter jets found none of them missing says us magazine Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.