Pakistani woman: गेल्या काही दिवसांपासून भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिक सापड्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. अशातच उत्तर प्रदेशातून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका पाकिस्तानी महिलेने बनावट कागदपत्रे बनवल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पाकिस्तानी महिलेने बनावट कागदपत्रे बनवून सरकारी शिक्षिकेची नोकरीही मिळवली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक पाकिस्तानी महिला सरकारी शिक्षिका बनली असल्याचे उजेडात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी ही बाब उघडकीस आल्यानंतर तपास करण्यात आला. तपासादरम्यान हा आरोप खरा असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेने नोकरी मिळवण्यासाठी अनेक बनावट कागदपत्रे तयार केल्याचे आढळून आले. यानंतर शिक्षिकेला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून महिलेविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महत्त्वाचे म्हणजे तब्बल नऊ वर्षे ही पाकिस्तानी महिला सरकारी शिक्षिका म्हणून काम करत होती आणि त्याची कुणालाही कल्पना नव्हती.
उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या फतेहगंज पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला. शुमायला खान ही महिला माधोपूर परिसरातील प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. बरेलीला लागून असलेल्या रामपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शुमायला खान यांची गुणवत्तेच्या आधारावर बीटीसीमध्ये निवड झाली होती. बीटीसी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१५ मध्ये सहायक शिक्षक पदावर नियुक्ती मिळाली होती. पहिली पोस्टिंग फतेहगंज पश्चिम भागातील माधोपूर भागात झाली होती.
शिक्षिका शुमायला खान यांच्याबाबत बऱ्याच दिवसांपासून तक्रारी येत होत्या. यानंतर प्राथमिक तपासात शिक्षिकेकडून कागदपत्रे मागविण्यात आली, मात्र त्या योग्य कागदपत्रे सादर करू शकल्या नाहीत. प्राथमिक तपासानंतर मे २०२४ मध्ये शिक्षकाला निलंबित करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू झाला. यावेळी, स्थानिक गुप्तचर युनिटच्या माहितीच्या आधारे शुमायला ही पाकिस्तानची नागरिक असल्याची माहिती मिळाली. तिने खरं लपवून बनावट रहिवासी प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवली. नियुक्तीदरम्यान शुमायला खानने रामपूरच्या कार्यालयातून जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र सादर केले होते. तपासणीअंती प्रमाणपत्र खोटं असल्याचे निष्पन्न झाले. शुमायला ही खरे तर पाकिस्तानची नागरिक आहे.
पाकिस्तानात जन्मलेली शुमायला तिच्या जन्मानंतर आईसोबत भारतात आली, तिची आई रामपूरमध्ये राहू लागली. त्यांना इथले नागरिकत्व मिळाले नाही. यानंतर आईने आपल्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र येथे बनवले. शुमायला रामपूरमध्येच शिकली. यानंतर शुमायलाला हळूहळू देशात बनवलेली सर्व कागदपत्रे मिळाली. शुमायलाकडून मिळालेल्या पॅन कार्डमध्ये जन्मतारीख ५ ऑगस्ट १९८१ आहे. त्यावर वडिलांचे नाव सितावत अली खान असे लिहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक शैक्षणिक अधिकाऱ्याने फतेहगंज पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी रामपूरच्या शुमायना खान हिने बनावट रहिवासी प्रमाणपत्र सादर करून सहायक शिक्षक पदावर नियुक्ती घेतल्याचे सांगितले आहे. शुमायला खानविरुद्ध फतेहगंज पश्चिम पोलिस ठाण्यात कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या चौकशीनंतर आरोपी शिक्षकावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.